

बेळगाव- येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंचविसाव्या हरेकृष्ण रथयात्रा महोत्सवाचा समारोप सोमवारी रात्री उशिरा झाला.
शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस हजारो भक्त कृष्णभक्तीत न्हावून गेले. शनिवारी रथ शहरात फिरून सायंकाळी इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळआनंद मंदिराकडे विसावला. त्यानंतर विविध कार्यक्रम झाले.
रविवारी वैष्णव यज्ञ, ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने, नाट्यलीला व महाप्रसाद आणि इतर कार्यक्रम झाले.
सोमवारी मॉरिशसहुन आलेल्या सुंदर चैतन्य महाराज यांचे हरेकृष्ण महामंत्राची महिमा सांगणारे प्रवचन झाले. “मनुष्याचे मन हेच त्याचा खरा शत्रू आहे मनामुळेच षडरिपु निर्माण होतात आणि त्यामुळे तणाव निर्माण होतो हे जर टाळायचे असेल तर कलियुगामध्ये हरेकृष्ण महामंत्राचा जप करण्याची गरज आहे. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे” या महामंत्राचे सातत्याने उच्चारण केल्याने मानवाचे मन आणि इंद्रिये शुद्ध करता येतात” असे ते म्हणाले.
इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी अमेरिका आणि इतर देशात जाऊन कृष्ण भक्तीचा प्रसार आणि प्रचार केला त्यामुळेच आज जग एका वेगळ्या वाटेने वाटचाल करीत आहे असेही ते म्हणाले.
त्यानंतर लहान मुलांचे अधुरम मधुरम हा संगीत कार्यकम झाला. त्यानंतर धारवाड हुन आलेल्या सुजश शानभाग आणि ग्रुप यांनी सादर केलेल्या भरतनाट्यमने रसिकांची मने जिंकली. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनावरील अनेक प्रसंग त्यांनी भरतनाट्यातून सादर केले.
रात्री इस्कॉनच्या भक्तांनी बसवलेली कालिया दमन ही नाटिका सादर करण्यात आली. विष्णू प्रसाद प्रभू हे सातत्याने गेल्या पंचवीस वर्षापासून नाट्यलिले च्या माध्यमातून लोकांना कृष्णभक्तीचा संदेश पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आजची ही नाट्यलीला सादर करण्यात आली. रात्त्रो महाप्रसाद झाला ज्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. देश-विदेशातून आलेल्या अनेक ज्येष्ठ संन्याशांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत ही रथयात्रा संपन्न झाली. गेल्या तीन महिन्यापासून अहोरात्र झटणाऱ्या इस्कॉनच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी आभार व्यक्त केले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta