बेळगाव : “रद्द करा रद्द करा, रिंग रोड रद्द करा” “नाही नाही कधीच नाही रिंग रोडसाठी जमीन देणार नाही” अशा जोरदार घोषणा देऊन बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय समोर जोरदार निदर्शने केली. यावेळी रिंगरोडसाठी शेतकऱ्यांचा सरकार विरोधी यल्गार दिसून आला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खात्याने बेळगाव तालुक्यात नियोजित रिंगरोड साठी भूसंपादन करण्यात येणार, असे काही वर्तमानपत्रातून सूचित केले होते. याची दखल बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेऊन हा रिंगरोड शेतकऱ्यांसाठी मारक आहे, हा रिंगरोड झाला तर शेतकरी देशोधडीला लागतील, या रिंगरोडची सध्याला बेळगाव तालुक्यात जरुरी नाही आणि बेळगाव शहरातील जी वाहनाची कोंडी निर्माण होते त्यासाठी उड्डाणपूल साकारून ही समस्या सोडवता येते. रिंगरोड रद्द व्हावा म्हणून शेतकऱ्यांनी चाबूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली जमीन याकरता देणार नाही असे बजावले होते. याची दखल सरकारने घेतली नाही म्हणून शेतकऱ्यानी कायदेशीर लढाईही चालू केली आहे. यामुळे सदर शेतकऱ्यांना कोर्टाकडून आपले म्हणणे मांडण्याची सुरुवात झाली आहे. याकरिता आज मंगळवार दिनांक 1 रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात वाघवडे, बाची येथील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी देऊन आपली सुपीक जमीन कोणत्याही परिस्थितीत या रिंगरोड साठी देणार नाही असा पवित्रा घेतला.
यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. श्याम पाटील, आर एम चौगुले, ऍड. प्रसाद सडेकर, दत्ता उघाडे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी कृषी उत्पन्न समितीचे सदस्य आर के पाटील, आप्पा जाधव, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, आर आय पाटील, भागोजी पाटील, सुनील अष्टेकर, पुंडलिक पावशे, कृष्णा हुंद्रे, दीपक पावशे, संजय पाटील, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta