बेळगाव : बेळगाव प्रशासनाला नेहमीच मराठी भाषेचा त्रास होत असतो. तर दुसरीकडे निवडणुका जवळ आल्या की लोकप्रतिनिधींना मराठीची जाग येते. याचा अनुभव अनेक वेळा बेळगावकरांना आलेला आहे. महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेला वगळण्यात आले आहे. बेळगाव महानगरपालिकेमधील महापौर- उपमहापौर कक्षा बाहेर असलेल्या फलकावरून जाणीवपूर्वक मराठीला वगळल्याचे निदर्शनात आले आहे. 6 फेब्रुवारी रोजी बेळगाव महानगरपालिकेची महापौर- उपमहापौर निवडणूक झाली. यानंतर लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आले. मनपाचा कारभार देखील सुरळीतपणे सुरू झाला. मात्र महापौर- उपमहापौरांनी आपले पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीलाच मराठी भाषेला दुर्लक्षित करण्यात आले. यामुळे मराठी भाषिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ज्या भागात 15 टक्के हुन अधिक लोक हे एका भाषेचे असतात त्यावेळी त्यांना त्यांच्या भाषेतून सर्व व्यवहार करण्याचा हक्क आणि अधिकार देणे हे तेथील प्रशासनाचे कर्तव्य असते. परंतु बेळगावमध्ये तर 90 टक्के लोक मराठी भाषिक आहेत. भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने दिलेल्या हक्कानुसार महानगरपालिकेत सुद्धा नियम लागू होणे आवश्यक आहे. परंतु जाणीवपूर्वक फलकावरून मराठीला डावलण्यात आल्याने मराठी भाषिकातून याचा विरोध व्यक्त होत आहे. महानगरपालिकेत आमदार, खासदारांच्या कक्षाबाहेर मराठी, इंग्रजी आणि कन्नड या तिन्ही भाषेत फलक लावण्यात आले आहेत. परंतु महापौर- उपमहापौर कक्षाबाहेरील फलकावर फक्त इंग्रजी आणि कन्नडमध्ये नावे लिहिण्यात आली आहेत. या ठिकाणी मराठी भाषा का काढून टाकण्यात आली आहे? असा संतप्त सवाल मराठी भाषिकातून उपस्थित होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta