अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी खास आकर्षण : संमेलनाची तयारी पूर्ण
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने उद्या रविवार दि. 19 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत (मराठी मुलांची शाळा येळळूरवाडी पटांगण परमेश्वर नगर येळळूर) 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्य संमेलन आयोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. साहित्यिक प्रा. डॉ. मिलिंद कसबे (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सत्रात हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनात संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, कृषी पुरस्कारांचे तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद कसबे आपले अध्यक्षीय भाषण करणार असून दुसऱ्या सत्रात मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची प्रकट मुलाखत होणार आहे. तिसऱ्या सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच प्रा. सुमित्रा यल्लोजीराव मेणसे स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचे कथाकथन व शैक्षणिक पुरस्कार वितरण होणार आहे.
चौथ्या सत्रात पुणे येथील इतिहासाचे अभ्यासक औदुंबर लोंढे यांचे खास शिवजयंती निमित्त “ढाल, तलवारी पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावर व्याख्यान होणार आहे. पाचव्या सत्रात मुंबई येथील कवी प्रा. प्रशांत मोरे “आई तुझा हात परिस.. .. “ हा कवितेचा कार्यक्रम सादर करणार आहेत. अठराव्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक ॲड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे तरी या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून येळूर गावचे माजी तालुका पंचायत सदस्य रावजी महादेव पाटील हे असणार आहेत उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थित हा संमेलन सोहळा पार पडणार आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ दिंडी सोहळ्याचे उद्घाटन होईल, ग्रामदेवतेचे पूजन कंग्राळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष यल्लोजीराव पाटील यांच्या हस्ते होईल, त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीचे उद्घाटन अभियंते व सरकारी कंत्राटदार विजय धामणेकर यांच्या हस्ते होणार आहे, दिवंगत लक्ष्मणराव मेलगे गुरुजी प्रवेशद्वाराचे उद्घाटन माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष तानाजी हलगेकर यांच्या हस्ते होईल, दिवंगत प्राचार्य रामभाऊ कुट्रे ग्रंथदालनाचे उद्घाटन माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य महेश जूवेकर यांच्या हस्ते होणार आहे, दिवंगत कामगार नेते राम आपटे सभामंडपाचे उद्घाटन अभियंते व युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते होणार आहे, स्वामी विवेकानंद विचारपीठाचे उद्घाटन माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते होणार आहे, तेव्हा साहित्यप्रेमी रसिकांनी संमेलनाला उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल, सचिव डॉ. तानाजी पावले व सदस्यांनी केले आहे.
संमेलन दृष्टीक्षेपात
ग्रंथ दिंडी : सकाळी 8-30 वाजता महाराष्ट्र हायस्कूलपासून सुरुवात, पहिले सत्र: उद्घाटन सकाळी 10, अध्यक्ष भाषण : सकाळी 10:45, दुसरे सत्र: दुपारी 1-00 वाजता, सुप्रसिद्ध ज्येष्ठ सिने अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांची प्रकट मुलाखत, साहित्य रसिकासाठी अल्पोपहार, तिसरे सत्र : कै. सुमित्रा मेणसे स्मृति स्पर्धेतील विजेत्यांचे कथाकथन व शैक्षणिक पुरस्कार वितरण, चौथे सत्र: दुपारी 3:30 वाजता प्रा. डॉक्टर औदुंबर लोंढे यांचे ढाल तलवारी पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज याबद्दल व्याख्यान, पाचवे सत्र : दुपारी ४:३० वाजता कवी संमेलन :आई तुझा हात परिस, कवी प्रा. प्रशांत मोरे (मुंबई) हे सादर करतील.