

रमाकांत कोंडुसकर यांच्या उपक्रमाचे गावकऱ्यांनी केले कौतुक
बेळगाव : बेळगाव सीमा भागातील मराठी भाषकांवर होणाऱ्या अत्याचाराला लगाम, बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवरायांची भव्य मूर्तीची स्थापना, अशा विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाला जाग आणण्यासाठी रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाद्वारे आजपासून येथील ऐतिहासिक राजहंसगडावरून शिवसन्मान पदयात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या शिवसन्मान यात्रेचे आजच्या पहिल्या दिवशी गावोगावात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर रमाकांत कोंडुसकर यांनी मराठी भाषिकांवरील अत्याचार, त्याचबरोबर शेतकरी कष्टकरी जनतेच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी सुरू केलेल्या, शिवसन्मान पदयात्रेचे गावकऱ्यांनी कौतुक व्यक्त केले.
आज सकाळी राजहंसगडावरील श्री महादेव मंदिरात पूजा, आरती करण्यात आली. यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी भगव्या ध्वजाचे पूजन केले. छत्रपती शिवरायांच्या जय घोषासह शिवसन्मान यात्रेला प्रारंभ झाला. पदयात्रेच्या अग्रभागी अश्वावर भगवा ध्वजधारी, त्याचबरोबर यात्रेत सजविण्यात आलेल्या रथात शिवमूर्ती ठेवण्यात आली आहे. भगवे ध्वज, छत्रपती शिवरायांचा जयघोष यामुळे आज राजहंसगडाला ऐतिहासिक वातावरणाची झालर लागली. पदयात्रेत कार्यकर्त्यांनी दिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेने गड दणाणून गेला. पदयात्रेच्या मार्गावर शेतात काम करत असलेल्या महिला भगिनींनी शिवसन्मान पदयात्रेचे स्वंयस्फूर्तीने स्वागत केले. त्याचबरोबर पदयात्रेतील अश्व आणि भगव्याची हार घालून पूजाही केली.
पदयात्रेच्या प्रारंभी शिवसन्मान पदयात्रेची माहिती देताना कोंडुसकर म्हणाले, बेळगाव सीमा भाग आणि कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा आणि भगव्याचा ध्वजाचा सातत्याने अवमान केला जात आहे. सीमा भागातील मराठी माणसांचा आत्मसन्मान चिरडण्याची एक संधी ही कर्नाटक प्रशासन सोडत नाही. बहुसंख्य मराठी भाषिक शेतकऱ्यांचे प्रश्न जटिल होत चालले आहेत. सरकारच्या आडमुठेपणामुळे तरुणवर्ग निराश बनला आहे. तरुण व्यसनाधीन होत आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. त्यांना तुरुंगात डांबण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी विविध प्रकारे संपादित करण्याचे कटकारस्थान सातत्याने सुरू आहे. याला विरोध करण्यासाठी शिवसन्मान पदयात्रा आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खानापूर समितीचे नेते आबासाहेब दळवी, महादेव पाटील, दत्ता जाधव, सागर पाटील, शिवानी पाटील, साधना पाटील आदी उपस्थित होते.
राजहंसगड येथून सुरू झालेली पदयात्रा येरमाळ गाव, अवचारहट्टी, देवगनहट्टी, धामणे मार्गे सायंकाळी येळूर येथे पोहोचली. येळ्ळूर येथे सायंकाळी पदयात्रेच्या वस्तीदरम्यान आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.
उद्या पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी सकाळी येळ्ळूर गावातून पदयात्रा पुढे निघेल. सुळगा, देसूर, झाड शहापूर, मच्छे, हूंचनहट्टी, बाळगमट्टी, कुट्टलवाडी मार्गे सायंकाळी पिरवाडी येथे पदयात्रेची वस्ती होईल.
Belgaum Varta Belgaum Varta