मंत्री गोविंद कारजोळ यांची माहिती
बेळगाव : मंगळवार दिनांक 27 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावला येत आहेत. या दौऱ्या दरम्यान ते विविध विकास कामांचा शुभारंभ आणि नव्या कामांना चालना देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण आणि बेळगाव, लोंढा, घटप्रभा या मार्गावर झालेल्या रेल्वेच्या दुपदरीकरण कामाचे उद्घाटन करणार असल्याची माहिती, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना कारजोळ म्हणाले, विविध कार्यक्रमांसह पंतप्रधान मोदी यांचा बेळगाव शहरात आठ किलोमीटर अंतराचा रोड शो ही होणार आहे, पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाला जिल्हाभरातून तीन लाख लोक उपस्थित राहतील. त्यामुळे विविध स्तरावर पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या नेते पदाधिकारी यांच्या सोबतही बैठकांचे आयोजन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या दरम्यान सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विशेष सुरक्षा पथकाच्या सूचनेनुसारच संपूर्ण दौऱ्याचे कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर गुरुवार दिनांक 2 मार्च रोजी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा नंदगड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असेही कारजोळ यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta