
बेळगाव : संस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांच्यातील उत्तम समन्वय, संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जाणारी उत्तम ग्राहक सेवा यामुळे बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने विश्वासार्हता प्राप्त केली असून याच बळावर या सोसायटीने लावलेल्या इवल्याशा रोपाचे रूपांतर प्रचंड अशा वटवृक्षात झालेले आहे, असे प्रशंसनीय उदगार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी काढले आहेत.
बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा गोवावेस येथील रेल्वे ओव्हर ब्रिजनजिकच्या मराठा मंदिर सभागृहात पार पाडला. या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते.
ज्यांची पत नाही, अशा तळागाळातील माणसांना संस्थेने आर्थिक पाठबळ पुरवून त्यांना स्वावलंबी बनविले आहे. एकंदर सहकार क्षेत्राचे जाळे तळागाळापर्यंत विणून संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्ष गाठतानाच सहकार क्षेत्रात उल्लेखनीय अशी भरारी मारली आहे, असेही श्री. जयंत पाटील म्हणाले. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता यामुळेच ही संस्था आज भक्कमपणे उभी असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन रमेश मोदगेकर होते. तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त पणन संचालक दिनेश ओऊळकर, प्राध्यापक डॉ. दत्ता पाटील, प्राध्यापक आनंद मेणसे, संस्थेचे व्हाईस चेअरमन रघुनाथ पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना गडहिंग्लज येथील प्राध्यापक डॉ. दत्ता पाटील यांनी, बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. समाजातील आर्थिकरित्या दुर्बल घटकांना कर्जरूपाने आर्थिक सहकार्य करून या सोसायटीने समाजात लहान-मोठे व्यावसायिक निर्माण केले आहेत. विशेष कार्यपद्धतीमुळेच ही सोसायटी सहकार क्षेत्रात भक्कमपणे उभी आहे, असे ते म्हणाले. सोसायटीने ग्राहक आणि सभासदांची विश्वासार्हता जपत चालवलेली वाटचाल गौरवास्पद असल्याचेही दत्ता पाटील म्हणाले.
निवृत्त पणन संचालक दिनेश ओऊळकर यांनी, संस्थेच्या प्रशंसनीय वाटचालीबद्दल कौतुक करून सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. सहकार क्षेत्रातील सद्य आव्हानांबद्दल त्यांनी विवेचन केले.
सुरुवातीला सृष्टी देसाई हिने स्वागतगीत सादर केले. रघुनाथ पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले. यानंतर माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सोसायटीच्या “सुवर्णाध्याय” या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर श्री. जयंत पाटील यांच्या हस्ते संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. याशिवाय जुने सभासद, संचालक आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. सी. वाय. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर के. सी. मोदगेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेचे सभासद, हितचिंतक, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta