बेळगाव : पक्षीय राजकारणाच्या नावाने सीमावादाला बगल देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसने आयोजित कार्यक्रमात सहभाग दर्शवल्यास त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा म. ए. समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी दिला होता. तर आमदार धीरज देशमुख यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्या कार्याचा लौकिक कायम राखून बेळगावातील कार्यक्रमांतून माघार घ्यावी, असे आवाहन मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले होते. तरीही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधाला झुगारून काँग्रेस नेते कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, छत्रपती संभाजी राजे आणि लातूरचे आमदार धीरज देशमुख बेळगावात दाखल झाले आहेत. किल्ले राजहंसगडावरील दुसऱ्यांदा होणाऱ्या शिवरायांच्या मूर्ती लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे कर्नाटक प्रशासनानेही यापुढे समितीच्या कार्यक्रमाला येणाऱ्या कोणत्याही महाराष्ट्रातील नेत्यांना अडवता कामा नये, अशी मागणी होत आहे.
राजहंसगडावर काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शिवमूर्ती लोकार्पण सोहळा रविवारी आयोजित केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील आमदार धीरज देशमुख, सतेश पाटील, संभाजीराजे छत्रपती आणि अभिनेता रितेश देशमुख यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमातून राजकीय लाभ उठवण्यात येणार असल्याचा आरोप करत समितीने महाराष्ट्रातील नेत्यांनी या कार्यक्रमाला येऊ नये, असे आवाहन केले. तरीही अभिनेता सोडून सर्वजण बेळगावला आले असल्याने समितीसह मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आलयं.
Belgaum Varta Belgaum Varta