Sunday , December 14 2025
Breaking News

राजहंसगडावरील शिवरायांच्या मूर्तीचे दुसऱ्यांदा उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : भगवे झेंडे, भगव्या पताका, भगवे फेटे घातलेले शिवप्रेमी तसेच तुतारी, झांज आणि ढोलपथकांचा दणदणाट अशा वातावरणात राजहंस गडावरील देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचे आज अनावरण करण्यात आले.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या संकल्पनेतून राजहंसगडावरील देशातील सर्वात उंच छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीचे शिवरायांचे तेरावे वंशज कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले. न भूतो अशा या शानदार सोहळ्यात शिवप्रेमींच्या उत्साह शिगेला पोहोचला होता. पारंपरिक शुभ्र कपडे, भगवे फेटे, टोप्या परिधान करून युवक, पुरुष तर भगव्या नऊवारी सद्य नेसून महिला या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. राजहंसगडाच्या पायथ्यापासून गडावरपर्यंतच्या मार्गावर सर्वत्र भगवे झेंडे फडकवण्यात आले होते. मार्गावर भगव्या पताका डौलाने फडकत होत्या. ढोलताशांच्या गजरात, तुतारीच्या निनादात शिवरायांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीच्या मार्गावर शिवभक्तांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. गडाच्या महाद्वाराचे या दरम्यान फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर गडावरील सिद्धेश्वर मंदिरात पूजाअर्चा करण्यात आली. पाहुणे व मान्यवर गडावर पोहोचल्यानंतर तेथे उभारलेल्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा व पाहुण्यांचा भगवी शाल व चांदीची तलवार देऊन आ. हेब्बाळकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर भगवा पडदा बाजूला सारून छत्रपती शिवरायांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी बोलताना महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री व विद्यमान विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, राजहंसगडावर शिवरायांची भव्य मूर्ती उभी करून त्यांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा वारसा जपण्याचे कार्य बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार हेब्बाळकर यांनी केले आहे.

आमदार धीरज देशमुख म्हणाले, आज आपण सगळे एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनलो आहोत. एखाद्या लोकप्रतिनिधीने दिलेले आश्वासन त्याच अवधीत पूर्ण करणे हे कौतुकास्पद आहे.

युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, महिन्यापूर्वी मला सतेज पाटील यांच्या माध्यमातून या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आ. हेब्बाळकर यांच्याकरवी फोन आला. त्यावेळी मी त्यांना होकार दिला. छत्रपती शिवराय केवळ महाराष्ट्राचे नव्हेत तर देशाचे, जगाचे दैवत आहेत. त्यांचे पुतळे महाराष्ट्राबाहेरही उभे राहिले पाहिजेत म्हणून मी येथे आलो आहे. हेब्बाळकर यांनी मी २५ फेब्रुवारीला यावे असे सुचविले. मात्र मी जयपूरला जाणार असल्याने ती तारीख देता येणार नाही असे सांगितले. त्यावर त्यांनी तारीख कोणतीही द्या, पण पुतळ्याचे उदघाटन तुमच्या, शिवरायांच्या वंशजांच्या हस्तेच झाले पाहिजे असा आग्रह धरला. मी कुठल्या राजकीय पक्षाचा सदस्य नाही. पण शिवरायांचा विचार, कर्तृत्व जेथे जातो तेथे गेलेच पाहिजे ही माझी भावना आहे. आ. हेब्बाळकर यांनी जनतेला, शिवभक्तांना दिलेला शब्द पाळून महाराजांचा भव्य ५० फुटी पुतळा उभारला आहे. हे काम प्रशंसनीय आहे. शिवरायांप्रमाणे महिलांचा सन्मान करा, त्यांचे विचार, आदर्श कृतीतून अंगी बाणवा असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर भावुक झाल्या. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक दिन आहे. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याचे समाधान आहे. पण सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारल्याबद्दल भाजप सरकारने माझ्यावर दोन केस दाखल केल्या आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये पराभव होऊनही 2018 मध्ये मी तुम्हाला आवाहन केले. मी आपल्या सर्वांची मुलगी म्हणून काम करणार असल्याचे सांगितले. लक्ष्मी हेब्बाळकरमध्ये हिम्मत कमी नाही. ते मला खूप त्रास देत आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते ग्रामीण मतदारसंघात शिष्टाचारानुसार पुतळ्याचे उद्घाटन केले नाही, पुतळ्याचे रंगकाम शिल्लक असूनही त्यांना बोलावून उद्घाटन करण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुतळा रंगविण्यासाठी आणलेले साहित्य पुतळ्याशेजारी असतानाही केवळ १२ मिनिटांत उद्घाटन करून राजकारण केले. माजी आमदार संजय पाटील, गोकाकचे आमदार यांनी घाईघाईने मुख्यमंत्र्यांना उदघाटनासाठी बोलावून तो कार्यक्रम उरकला अशी टीका त्यांनी केली. दोन महिन्यांवर निवडणुका येत आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने मी आता हे उद्घाटन करत नाही. या पुतळ्यासाठी काँग्रेस-जेडीएसचे युती सरकार असताना डी. के. शिवकुमार कन्नड व संस्कृती खात्याचे मंत्री असताना त्यांनी निधी मंजूर केला होता. काही कारणाने ते सरकार पडले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडे पाठपुरावा करून पुन्हा निधी मंजूर करवून घेतला. नंतर कोरोना व अतिवृष्टीमुळे तीनेक वर्षे हे काम पूर्ण होऊ शकले नाही.छत्रपती शिवाजी महाराज महिलांचा खूप आदर करत. महिलांबद्दल अवमानकारक विधान करणारे ते शिवभक्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते ढोंगी शिवभक्त असल्याचे सांगत त्यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. लक्ष्मी हेब्बाळकर देवाला समोर ठेवून राजकारण करत नाहीत. ग्रामीण भागातील जनता माझा देव आहे. एवढे चांगले काम करण्यासाठी तुम्ही मला सक्षम केले आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा साकारणारे मूर्तिकार जे. जे. पाटील बंधूंचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला उन्हातान्हाची पर्वा न करता हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *