शहापूर पोलीस ठाणे शांतता समितीची बैठक संपन्न
बेळगाव : होळी, रंगपंचमी बरोबरच मुस्लिम धर्मियांचा शब्बे बरास सण साजरा केला जाणार आहे. हे सर्व सण आणि उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे करा, असे आवाहन शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांनी बोलताना केले.
आज रविवारी सायंकाळी शहापूर पोलीस ठाणे येथे होळी रंगपंचमी आणि शब्बे बारस सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थित नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतर सुनीलकुमार पुढे म्हणाले, आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक जण आपले सण आणि उत्सव साजरे करतात. विविध ठिकाणी विविध प्रकारे सण साजरे केले जातात. बेळगाव शहरात विविध ठिकाणी दोन दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. होळी रंगपंचमी हे सण आनंदाचे आहेत. अशा सण उत्सवाच्या काळात वादविवाद टाळा. सण उत्सवाला गालबोट लागू देऊ नका. रंगपंचमी दरम्यान नैसर्गिक रंगांचा वापर करा. जबरदस्तीने कोणालाही रंग लावू नका. रंगपंचमी दिवशी शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी अथवा कामाला जाणाऱ्यांवर रंग फेकू नका. स्पीकर साठी परवानगी घ्या. कोणताही अनुचित प्रकार घडत असल्यास त्याची पोलिसांना तात्काळ माहिती द्या, असे आवाहनही सुनीलकुमार यांनी केले.
यावेळी नगरसेवक गिरीश धोंगडी, माजी नगरसेवक नेताजी जाधव, सलीम सय्यद, रहमान मिर्झा भाई यांनी आपले विचार मांडले. बैठकीला शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, खासबाग येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta