बेळगाव : वडगाव आनंदनगर येथे पाण्याची समस्या आवासून उभी आहे. मागील 15 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्या सौ. शिवानी पाटील यांनी ही बाब समिती नेते रमाकांत (दादा) कोंडुस्कर यांच्या निदर्शनास आणून देताच रमाकांत कोंडुस्कर यांनी स्वखर्चातून वडगाव विभागासाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला.
एल अँड टी कंपनीच्या बेजबाबदार कारभाराचा फटका नेहमीच बेळगावकराना सहन करावा लागतो. गळती निवारण्यासाठी शहर व उपनगरात विविध ठिकाणी पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. वडगाव भागात मागील पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही परिणामी नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महिलावर्गात प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली आहे. स्थानिक नगरसेवक नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत परगावी निघून गेल्याची चर्चा देखील महिला वर्गात रंगली आहे. वॉर्ड क्र.50 च्या नगरसेविकेच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप त्या विभागातील महिला करताना दिसून येत आहेत.
वॉर्ड क्र. 50 मधील जनतेच्या समस्या जाणून रमाकांत कोंडुस्कर हे आनंदनगरवासियांच्या मदतीला धावले आणि स्वखर्चाने दररोज दोन टँकर पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे आनंदनगरवासियांची तहान भागली आहे. रमाकांत कोंडुस्कर यांच्या या कार्यामुळे वॉर्ड क्र. 50 मधील नागरिकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta