Wednesday , December 10 2025
Breaking News

दुग्धाभिषेक सोहळा यशस्वी करण्याचा वाघवडेवासियांचा निर्धार

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने येथे रविवार दि 19 मार्च रोजी येळ्ळूर येथील राजहंसगडावर होणाऱ्या छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा दुग्धाभिषेक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तो यशस्वी करण्याचा निर्धार वाघवडे (ता. जि. बेळगाव) येथे आयोजित जनजागृती सभेमध्ये व्यक्त करण्यात आला.

येळ्ळूर राजहंसगडावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा दुग्धाभिषेक सोहळ्या संदर्भातील जनजागृती सभा वाघवडे गावात नुकतीच पार पडली. सभेचे अध्यक्षस्थानी सुभाष बाबुराव देसाई हे होते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. के. पाटील, आर. आय. पाटील, भागोजी पाटील, कृष्णा हुंदरे, पुंडलिक पावशे, मंगेश पाटील, राजू लोहार आदी उपस्थित होते. प्रारंभी एम. टी. अंबोळकर यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सभेत बोलताना माजी आमदार किणेकर यांनी सर्वप्रथम दुग्धाभिषेक डोळ्याची कल्पना कशी पुढे आली याची थोडक्यात माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, ज्यावेळी 1956 साली सीमाप्रश्न अस्तित्वात आला, तेंव्हापासून भगवा ध्वज उभारून छ. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आपण सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लढत आहोत. आजकालच्या राज्यकर्त्यांना इतर वेळी महाराजांचा विसर पडतो, मात्र निवडणुका जवळ आल्या की त्यांना महाराज आठवतात. त्याचे उदाहरण म्हणजे बेंगलोर येथे झालेली शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना हे आहे.

महाराजांच्या विटंबनेचा बेळगावात आंदोलन छेडून निषेध करण्यात आला. त्यासाठी आंदोलन करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगावी लागली. त्यावेळी तर सर्व राज्यकर्ते मूग गिळून गप्प बसले होते. शिवाय त्यानंतर बेळगावात झालेल्या हिवाळी अधिवेशनातही या भागातील एकाही लोकप्रतिनिधीने बेंगलोरच्या घटनेचा निषेध केला नाही. लोकशाहीच्या अधिकारानुसार आमचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यावेळी शिवरायांच्या अवमानाचा निषेध केला होता मग त्यांना अटक का करण्यात आली? असा जाब त्यांनी विचारला नाही. शिवछत्रपतींसाठी आंदोलन केल्याबद्दल कार्यकर्ते आणि नेत्यांवर राजद्रोहा सारखा अतिशय गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. तेंव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून फक्त मराठी मतांसाठी महाराजांच्या नावाचा वापर करणाऱ्या या नेत्यांपासून आपण सावध राहावयास हवे. आज या राज्यकर्त्यांच्या बॅनरवर मराठी अक्षरे दिसू लागली आहेत. तेच आम्ही गेले अनेक वर्षे सरकारी कागदपत्रे मराठी भाषेत मिळावीत अशी मागणी करत आहोत मात्र त्याला हे राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी कोणीही पाठिंबा देत नाहीत. कोणीही त्यासाठी प्रयत्न करत नाही असे सांगून राजहंसगडावरील शिव दुग्धाभिषेक सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावकऱ्यांनी आपापल्या परीने साहित्य अथवा निधीच्या स्वरूपात शक्य होईल तितकी मदत करून सहकार्य करावे आणि सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केले.

माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, आर. के. पाटील, कृष्णा हुंदरे, पुंडलिक पावशे वगैरे व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी देखील समयोचित विचार व्यक्त करून वाघवडे गावकऱ्यांना दुग्धाभिषेक सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. जनजागृती सभेला ज्योतिबा अंबोळकर, मोहनराव देसाई, राजेंद्र पाटील, महादेव बिर्जे, नारायण सावगांवकर, सचिन दळवी, राजू दिवटगे, नागेशी अंबोळकर, दीपक अंबोळकर, यल्लाप्पा मुसळे, दाजीबा बेळगुंदकर, मनोहर पाटील, बंडू गुरव नारायण कुप्पूटकर, प्रशांत जळगेकर, राहुल गुरव, प्रदीप गुरव, राजू अंबोळकर, विठ्ठल गुरव, के. के. पाटील, ओमकार बेळगावकर आदींसह वाघवडे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सभेमध्ये अखेर दुग्धाभिषेक सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी राहून तो यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. एम. टी. अंबोळकर यांनी सर्वांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव कँटोन्मेंट बोर्ड कार्यालयावर सीबीआयचा छापा

Spread the love  बेळगाव : टेंडर वाटप आणि बेकायदेशीर भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या तीव्र आरोपांनंतर, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *