बेळगाव : अनगोळ, झेरे गल्ली येथे घराला आग लागून घरातील गृहोपयोगी आणि खाद्योपयोगी ऐवज जळून खाक झाला. रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या एका गरीब महिलेच्या घराला आग लागून आगीत गृहोपयोगी आणि खाद्योपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने ही महिला मोठ्या अडचणीत आली आहे.
घटनेची माहिती समजताच भाजप कर्नाटक राज्य ओबीसी युवा मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाच्या संयोजक किरण जाधव आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन पाहणी केली व घर जळालेल्या त्या महिलेची विचारपूस करून तिला सर्वोत्तोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
रमाकांत कोंडुसकर यांनी त्या घराचे छप्पर उभारून देण्याची ग्वाही दिली तर किरण जाधव यांनी कुटुंबासाठी लागणारी भांडीकुंडी आणि खाद्योपयोगी साहित्य देण्याची ग्वाही दिली.
किरण जाधव आणि रमाकांत कोंडुसकर यांच्या या कार्यतत्परतेने त्या महिलेला खरोखरच एक आधार मिळाल्याचे जाणवले. जणू पाठीराखे भाऊच संकटसमयी धावून आले असे वाटते असे ती महिला यावेळी बोलून गेली.
किरण जाधव यांनी यावेळी त्वरित तहसीलदार व संबंधित उपायुक्तांना ही माहिती कळवून घटनास्थळी बोलाविले व घटनेचा पंचनामा करून शक्य तितक्या लवकर त्या महिलेला आर्थिक मदत मिळवून देण्याची विनंती केली. किरण जाधव आणि रमाकांत कोंडुसकर यांच्या या कर्तव्यतत्परतेबद्दल उपस्थितांतून समाधान व्यक्त होत होते.
Belgaum Varta Belgaum Varta