बेळगाव : लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. सर्वच राष्ट्रीय पक्ष साम, दाम, दंड, भेद वापरून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. बेळगाव तालुका समिती, खानापूर तालुका समिती देखील जोमाने कामाला लागलेली पाहायला मिळत आहे. मात्र शहर समिती आजतागायत निद्रिस्त आहे यामागचे गौडबंगाल काय?, तसेच समिती कार्यकर्त्यांनी वारंवार मागणी करून देखील शहर समितीची विस्तृत कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी चालढकल करण्यामागचा हेतू काय? असा सवाल समितीप्रेमी कार्यकर्त्यांना पडला आहे.
वास्तविक पाहता शहर समितीने विस्तृत कार्यकारिणी जाहीर करून व्यापक बैठक बोलवून आगामी विधानसभा निवडणुक कशी लढवावी, उमेदवार निवडीचे निकष कोणते असावे व उमेदवार निवड प्रक्रिया कशी राबवावी? याबाबत सविस्तर चर्चा करणे गरजेचे आहे. पूर्वापार चालत आलेली निवड प्रक्रियेत योग्य तो बदल घडवून कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊन निवडणूक प्रक्रिया राबविली पाहिजे असे मत जाणकार व्यक्त करताना दिसत आहेत.
विधानसभेसाठी उमेदवार निवड करताना एक विशिष्ट नियमावली असणे गरजेची आहे जसे की निवडणुकीची रणनीती ठरविणे, समितीचा एकच उमेदवार असावा जेणेकरून दुहीचा फटका बसणार नाही यादृष्टीने समिती नेतृत्वाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. बंडखोरी होणार नाही यासाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. मागील पंधरा वर्षांपासून समितीला दुहीचा शाप लागलेला आहे. त्यामुळे मराठी भाषिक जनता राष्ट्रीय पक्षाकडे वळलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर निष्ठावंत समिती प्रेमी संभ्रमावस्थेत आहेत. समिती नेतृत्वाने जनतेतील संभ्रम दूर करून समितीबद्दल जागृती करणे आवश्यक आहे. मात्र शहर समितीकडून अशी कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली आपल्याला पहायला मिळत नाही. यामागचे नेमके कारण काय? शहर समितीची निवडणूक प्रक्रिया संथगतीने का चालू आहे? असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात उपस्थित होत आहेत.
सद्यपरिस्थिती पाहता राष्ट्रीय पक्षाला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे तगडा उमेदवार असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवाराचे समाजात एक वेगळे प्राबल्य आहे किंवा त्याची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. उसने अवसान आणून नेतेगिरी करणारा उमेदवार दिल्यास समितीचे पानिपत होण्यास वेळ लागणार नाही.
Belgaum Varta Belgaum Varta