बेळगाव (प्रतिनिधी) : भाऊबीजेनंतरचा दिवस हा बहिणतीज म्हणून ओळखला जातो. बहिणींच्या दृष्टीने विशेष आनंदाचा असणारा हा सण सांबरा येथील दोघा बहिणींसाठी कर्दनकाळ ठरला. तलावात बुडून दोघा सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी महादेव तलाव येथे घडली. त्यामुळे सांबरा परिसरावर शोककळा पसरली आहे.
मागील दोन दिवसांपासून घरामध्ये झालेल्या पूजेचे निर्माल्य तलावात विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तीन बहिणींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तिघींनाही लेकव्ह्यू हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र तिघींपैकी एकीला वाचविण्यात यश आले.
नेत्रा कोळवी (वय 8) आणि प्रिया कोळवी (वय 6) अशी या घटनेत मयत झालेल्या दोन बहिणींची नावे आहेत. तर संध्या कोळवी (वय 10) मोठ्या बहिणीला वाचवण्यात आले आहे. मुलींना वाचवण्यासाठी नागेश देसाई, सुरेश कोलकार, भुजंग निर्मळ, विनोद होळकर यांनी प्रयत्न केले.