


बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आज उचगाव येथील श्री मळेकरणी देवस्थानात पूजन करून प्रचाराचा झंझावाती शुभारंभ केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी श्री मळेकरणी देवस्थानात पूजन करून जोरदार घोषणाबाजी करत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. मनोहर किणेकर, ऍड. सुधीर चव्हाण, सुनील अष्टेकर, मनोज पावशे, लक्ष्मण होनगेकर, बी. एस. होनगेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री मळेकरणी देवस्थानाच्या प्रांगणात उपस्थित मान्यवरांनी आर. एम. चौगुले यांना शुभेच्छा देत निवडणुकीची रणनीती कशापद्धतीने आखण्यात यावी, यावर विचार मांडले.
यावेळी बोलताना मनोहर किणेकर यांनी समितीकडे प्रत्येक मराठी भाषिक कुटुंबाचे मत वाळविण्यासंदर्भात सूचना केल्या. याचप्रमाणे अनेक महिला राष्ट्रीय पक्षांच्या आमिषाला बळी पडत असून आपल्या कुटुंबातील महिलांसह संपूर्ण गाव आणि आपल्या आसपास परिसरातील प्रत्येक कुटुंबातील मतदाराला समितीसंदर्भात महत्व पटवून देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. ऍड. सुधीर चव्हाण यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आपण प्रत्येकजण उमेदवार असल्याप्रमाणे कार्य करून समितीला विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी सुनील अष्टेकर, लक्ष्मण होनगेकर, प्रा. सरिता गुरव, मनोज पावशे, बाळासाहेब देसाई, अरुण जाधव आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
उचगाव मळेकरणी देवस्थानाच्या प्रांगणातून पुढे प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली. यावेळी उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून उचगाव मध्ये गल्लोगल्ली प्रचार करण्यात आला. यानंतर हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रचारफेरीला मोठ्या संख्येने महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, कार्यकर्ते आणि महिलावर्ग उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta