बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने जनमतातून अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना विजयी करण्याची जबाबदारी मराठी भाषिकांची आहे, असे मत शहर समितीच्या बैठकीत खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले.
शहर म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक 18 रोजी मराठा मंदिर सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी हे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, निवडणूक हा एक लढ्याचा भाग आहे. सीमा प्रश्न सोडवण्यासाठी आणि मराठी भाषिकांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूक लढवीत असते यावेळी दक्षिण मतदार संघातून हिंदुत्ववादी विचारसरणीचे श्री. रमाकांत दादा कोंडुसकर यांना उमेदवारी मिळालेली आहे. रमाकांत दादा कोंडुस्कर यांच्या पाठीशी श्रीराम सेना हिंदुस्तान संघटना व महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद या जोरावर यावेळी आम्ही दक्षिण मतदार संघात भगवा ध्वज फडकविल्याशिवाय राहणार नाही तसेच उत्तर मतदारसंघात ऍड. अमर येळ्ळूरकर यांच्या रूपाने नवीन चेहऱ्याला संधी दिलेली आहे. दोन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्याची जबाबदारी ही मराठी भाषिक समिती कार्यकर्त्यांची आहे. त्यासाठी मराठी भाषिकांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीच्या बळावर हा विजय निश्चित असणार आहे.
शहर समितीच्या बैठकीत अधिकृत उमेदवार श्री. रमाकांत कोंडुसकर व ऍड. अमर येळ्ळूरकर यांचा सत्कार अध्यक्ष दीपक दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच निवड कमिटीची धुरा सांभाळलेले अनिल अमरोळे व गजानन पाटील यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर शहर समितीचे उपाध्यक्ष येतोजी, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण पाटील आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षाचे नेते चित्रा वाघ व गिरीश महाजन हे सीमा भागात राष्ट्रीय पक्षाच्या प्रचारासाठी आलेले आहेत त्यांच्या या भूमिकेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच त्यांच्या निषेधाचा ठराव देखील करण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारची बांधिलकी नेमकी कोणाशी आहे हे स्पष्ट करावे असे आवाहन देखील यावेळी बैठकीत करण्यात आले.
यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर, शिवराज पाटील, मदन बामणे, सागर पाटील, प्रकाश अष्टेकर, एम. आर. पाटील, अनिल पाटील, शिवानी पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व दक्षिण व उत्तर मतदार संघातील उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार देखील करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta