Wednesday , December 10 2025
Breaking News

हिंमत असेल तर भाजपने मतपत्रिकेद्वारे निवडणूका घ्याव्या; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

Spread the love

 

बेळगाव : भारतीय जनता पक्ष देश लुटत आहे. पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय धनाढ्य बनत चालले आहेत. तर दुसरीकडे देश कंगाल बनत चालला आहे अशी टीका करून भाजपने पराभव स्वीकारला पाहिजे. भाजपच्या पराभवाची सुरुवात कर्नाटकातून होणार आहे. मोदी लाटेवर भाजपचा विश्वास असेल तर त्यांनी मतपत्रिकेद्वारे निवडणूका घ्याव्या, असे आवाहन आम आदमी पक्षाचे नेते पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगांव दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, 10 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुक आहे. सुदैवाने आम आदमी पार्टीला नुकताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा उपलब्ध झाला आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाची ही पहिलीच निवडणूक आहे. मी हुबळी तसेच अन्य मतदारसंघात गेलो असता रोड शोच्या दरम्यान मतदारांनी आम आदमी पार्टीला चांगलाच प्रतिसाद दिला. लोक स्वतःहून आम आदमी पार्टीकडे आकर्षित होत आहेत. याचाच अर्थ जनतेला बदल हवा आहे जुन्या यंत्रणेला नागरिक कंटाळलेले आहेत.
दक्षिण हुबळी, धारवाड आदी भागांमध्ये मला काल पंजाब सारखे वातावरण वाटले. आम आदमी पार्टी हा इमानदार पक्ष आहे. अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानावरून एका छोट्या समूहाच्या स्वरूपात सुरू केलेला हा पक्ष आज राष्ट्रीय स्तरावरील मोठा पक्ष बनला आहे. असे सांगून त्यांनी आपल्या पक्षाबद्दल माहिती देताना हा सध्याच्या घडीला देशातील वेगाने वाढणारा राष्ट्रीय पक्ष आहे असे सांगितले. भाजपकडून लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप देखील यावेळी मान यांनी केला. भाजप आपल्या स्वार्थासाठी दुटप्पी राजकारण करीत आहे. सत्तेसाठी भुकेलेला भाजप पक्ष एखाद्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरला तर ठीक आहे अन्यथा त्या राज्यात पोटनिवडणूक घडवून आणण्यात धन्यता मानतो. त्यासाठी इतर पक्षातील आमदार फोडून राजीनामा सत्र अवलंबून पोटनिवडणूक घेण्यास भाग पाडायचे असे भाजपचे तंत्र आहे. एखाद्या वेळेस एखाद्या राज्यात निवडणुकीत अपयश आलेच तर राज्यपालांकरवी त्रास देणे हा देखील त्यांचा एक दुसरा पर्याय आहे. सध्या देशातील पंजाब, बंगाल, तामिळनाडू या ठिकाणी हाच प्रकार सुरू आहे. लोकशाहीत निवडक लोक नव्हे तर निवडून आलेले लोक निर्णय घेत असतात. पण भाजप मात्र सत्ताधाऱ्यांना राज्य चालू देत नाही. एकंदर ज्या राज्यात आपले सरकार नाही त्या राज्यातील सरकारला त्रास देणे एवढेच काम भाजपा करते.
भारतीय जनता पार्टी म्हणजे भ्रष्ट पार्टी आहे. ते फक्त खोटी आश्वासने, खोट्या योजना, जनतेसमोर मांडून राजकारण करतात असे सांगून पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सत्तेत आल्यापासून त्यांनी राबविलेल्या विविध योजनांची माहिती मान यांनी पत्रकारांना दिली.
बेळगाव व पंजाब येथे साम्य असलेली एक बाब म्हणजे ऊसदरही आहे. वर्षभरापूर्वी पंजाबमध्ये देखील शेतकऱ्यांची अवस्था बेळगावच्या शेतकऱ्यांसारखीच होती. पंजाबमध्ये देखील ऊसाला योग्य दर मिळत नव्हता. कायद्यानुसार ऊसाचे बिल 14 दिवसांमध्ये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे परंतु ते वर्षानुवर्षे मिळत नव्हते. मात्र आम आदमी पार्टी सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम 392 कोटी रुपये इतकी ऊसाची थकीत बिल अदा केली. आज ऊसाला प्रतिक्विंटल 380 रुपये इतका सर्वाधिक दर पंजाबमध्ये दिला जात असल्यामुळे शेतकरी खुश आहेत, असे त्यांनी सांगितले. भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत टीका करताना मुख्यमंत्री मान यांनी आज मंत्र्यांच्या घरात नोटा मोजण्याची यंत्र सापडू लागली आहे ती दुर्दैवी गोष्ट असल्याचे सांगितले. भाजप देशाला लुटत आहे. आज मोदींचे मित्र धनाढ्य होत आहे. दुसरीकडे देश कंगाल होत आहे. आम आदमी पार्टीचे पक्षाचे झाडू हे आहे आणि झाडूचे काम कचरा साफ करणे हे आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आम्ही तेच काम करत आहोत असे सांगून सर्वेक्षणाबाबत बोलताना आम्ही सर्वेक्षणामध्ये येत नाही. थेट सरकारमध्ये येतो असे मुख्यमंत्री भगवंत मान मिश्किलपणे म्हणाले. तसेच भाजपने पराभव पचवायला शिकला पाहिजे जे त्यांना आता कर्नाटकातून शिकावे लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुका म्हणजे भाजपा सरकारच्या अपयशाची नांदीच ठरणार आहे. भाजपाला जर स्वतःवर विश्वास असेल तर त्यांनी ईव्हीएम मशीनवर बंदी घालत बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असे थेट आव्हान देखील पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी केले.
याप्रसंगी बेळगाव उत्तर मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार राजकुमार टोपन्नावर यांच्यासह आपची इतर नेते मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सांबरा विमानतळावर आज सकाळी मुख्यमंत्री भगतसिंग मान यांचे आगमन होतात शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. यावेळी आजच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *