Thursday , March 5 2026
Breaking News

म. ए. समितीच्या प्रचाराला नेते पाठवा; मात्र राष्ट्रीय पक्षांचा प्रचार नको

Spread the love

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना मध्यवर्ती समितीचे पत्र

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून म. ए. समितीच्या उमेदवारांनी सर्व ताकदीनिशी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता त्यांच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या प्रचारासाठी नेतेमंडळींनी उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. बेळगावात येणाऱ्या नेत्यांची नावे द्यावीत, याचबरोबर राष्ट्रीय पक्षांच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळी येत आहेत. त्यांना तातडीने रोखावे, अशा मागणीचे पत्र मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.

विधानसभेची निवडणूक १० मे रोजी होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने पाच मतदारसंघांमध्ये उमेदवारांची नावे निश्चित करून त्यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, खानापूर व यमकनमर्डी या मतदारसंघांमध्ये समितीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सध्या सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी म. ए. समितीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येणे गरजेचे आहे. जे नेते बेळगावमध्ये येऊन मार्गदर्शन करणार आहेत, त्यांचा संपूर्ण तपशील द्यावा. जेणेकरून आम्हाला निवडणूक यंत्रणेकडून परवानगी घेणे सुलभ होईल, असे या पत्रात म्हटले आहे.
गेली ६६ वर्षे सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत आहे.
लोकशाहीमार्गाने लढा देत असताना मराठी भाषिकांवर आजपर्यंत अन्याय झाला आहे. असे असताना राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळी येत आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांतून संताप व्यक्त होत आहे. तेव्हा महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येऊ नये, असेही एक पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे. या पत्रावर अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह माननीय उद्धव ठाकरे, शरद पवार, शंभूराजे देसाई, चंद्रकांतदादा पाटील, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंतराव पाटील, चंद्रकांत बावनकुळे, संजय राऊत यांनाही पत्र पाठविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *