बेळगाव : खानापूर मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि भाजपच्या बेळगाव जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष जे काम देईल ते प्रामाणिकपणे करू, असे सांगितले आहे.
खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मी संपूर्ण मतदारसंघात पक्षाचे संघटन केले आहे. मी संपूर्ण मतदारसंघात फिरून भाजप सरकारच्या योजना राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. वस्त्यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. वीज जोडणी नसलेल्या गावांना वीज देण्याचे काम केले आहे. घरपोच रेशन पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. गावोगावी आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत. मी चोवीस तास जनसंपर्क कार्यालय सुरू केले असून हजारो लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे.
परंतु तेथे विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मला तिकीट न मिळाल्याने माझे समर्थक नाराज होते. मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या सर्वांना शांत केले. सर्वजण नेहमीप्रमाणे भाजपसाठी काम करतील, असे आम्ही ठरविले आहे.
खानापूरसह जिल्ह्याच्या कोणत्याही भागात भाजपसाठी काम करण्यास मी तयार आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेली कोणतीही जबाबदारी मी पार पाडेन. आगामी काळात जिल्ह्यात पक्ष अधिक बळकट होईल. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्पष्ट बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वास डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta