बेळगाव : शहरातील आनंदवाडी येथील फुटलेल्या भूमिगत ड्रेनेज पाईपलाईनच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या ठिकाणी नवी पाईपलाईन घालण्याची मागणी केली जात आहे.
आनंदवाडी येथील युनिव्हर्सल वर्कशॉप समोरील रस्त्या शेजारी असलेली भूमिगत ड्रेनेज पाईपलाईन फुटली असून सांडपाणी तुंबण्याबरोबरच ते जमिनीत झिरपून आसपासच्या विहिरींना धोका निर्माण झाला आहे. सदर फुटलेली ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्त करण्याची आणि त्या ठिकाणी नवी पाईपलाईन घालण्याबाबत यापूर्वी बऱ्याचदा मागणी करण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवकांना देखील या ड्रेनेज समस्येची माहिती देऊन ती दूर करण्याची बऱ्याचदा विनंती करण्यात आली आहे. मात्र नगरसेवकासह महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार कोणीच दखल घेत नसल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परवानगी मिळाल्यास आणि जेसीबीने खोदाई करून दिल्यास काही नागरिकांनी स्वखर्चाने नवे ड्रेनेज पाईप घालण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
सध्या योगायोगाने आनंदवाडी येथील युनिव्हर्सल वर्कशॉप समोरील रस्त्यावर विकास काम हाती घेण्यात आले आहे. सदर कामाबरोबरच येथील फुटलेली ड्रेनेज पाईपलाईनही बदलणे शक्य आहे. तेंव्हा हे लक्षात घेऊन सदर ड्रेनेज पाईपलाईन बदलावी अथवा जेसीबीने खोदाई करून ती घालण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी जोरदार स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta