Wednesday , December 10 2025
Breaking News

म. ए. समितीच्या प्रचाराचा येळ्ळूरमध्ये झंझावात!

Spread the love

 

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचार कार्याला सर्वच मतदार म संघात वेग आला आहे. विशेषतः बेळगाव दक्षिण मतदार संघ समितीसाठी प्रतिष्ठेचा बनला असल्याने संपूर्ण सीमाभागाचे लक्ष या मतदार संघाकडे लागले आहे. युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांना समितीने उमेदवारी दिल्याने उत्साहाचे वातावरण आहे. रविवारी येळ्ळूर गावात त्यांच्या प्रचारार्थ निघालेल्या प्रचंड पदयात्रेने याचा प्रत्यय आणून दिला. या पदयात्रेस ग्रामस्थांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद विरोधकांच्या छातीत धडकी भरविणारा आहे. कारण भाजपने आपले लक्ष येळ्ळूरवर केंद्रीत केले. येळ्ळूर आणि परिसरातील मराठी मते जर आपणाला घेता आली तर आपला विजय सुकर होईल असे भाजपला वाटते. आता मात्र चित्र बदलले आहे. हजारो स्त्री-पुरूष समितीच्या पदयात्रेत तळपत्या उन्हाची पर्वा न करता सहभागी झाले होते. त्यात प्रथमच मतदानाचा अधिकार प्राप्त झालेल्या तरूणांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. काहींनी मनोगत व्यक्त करून महाराष्ट्रात सामील होण्याच्या आपल्या भावना व्यक्त केल्या व या लढाईत कोंडुसकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत याची ग्वाही दिली. या पदयात्रेने गावात जणू भगवे वादळच आले होते. येळ्ळूर हे ‘लढाऊ गाव’ म्हणून सीमा लढ्यात अग्रभागी राहिले आहे. स्वतंत्र भारतात झालेला साराबंदीचा लढा येळ्ळूरच्या जनतेने प्राणाची बाजी लावून लढविला. (त्यावेळचे ) म्हैसूर राज्यच आपण मानत नाही. यामुळे सारा भरणार नाही, असा ग्रामस्थांनी निर्धार केला. त्यामुळे सारा वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना माघारी परतावे लागल्याने पोलिसांनी दडपशाही सुरू केली. लाठीहल्ला करूनही लोक नमत नाहीत. हे पाहून गोळीबारही करण्यात आला. त्यात काही जण जखमी झाले. तरीही कुणी मागे हटले नाहीत. सीमा लढ्याच्या इतिहासात याला तोड नाही. निवडणुकीच्या लढाईतही हा गाव मागे राहिलेला नाही. आधी हा गाव पूर्वीच्या उचगाव मतदार संघात होता. येथून १९५७ पासून ५० वर्षे समितीचे उमेदवार निवडून आले. कै. व्ही. एस. पाटील, परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, अॅड. प्रभाकर पावशे, बी. आय. पाटील, मनोहर किणेकर यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या विजयात येळ्ळूर गावचा वाटा मोठा होता. पण पुनर्रचनेनंतर २००८ साली निर्माण झालेल्या बेळगाव दक्षिण मतदार संघात येळ्ळूर गावचा समावेश करण्यात आला.
बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे हा मतदार संघ भाजपकडे गेला व अभय पाटील हे निवडून आले. पण पुढच्याच २०१३ साली झालेल्या निवडणुकीत समितीने या मतदार संघावर पुन्हा कब्जा मिळविला. समितीचे उमेदवार माजी महापौर संभाजी पाटील हे निवडून आले. त्यांना ५४४२६ मते पडली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी अभय पाटील यांना ४८११६ मते मिळाली व ते पराभूत झाले. मात्र नंतर ही जागा समितीला राखता आली नाही. अभय पाटील पुन्हा निवडून आले. पण सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त डोक्यावर असल्याने त्यांनी मनमानी सुरू केली. यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड राग आहे. येळ्ळूरमध्ये रमाकांत कोंडुसकर यांच्या पदयात्रेत हजारो लोकांनी घेतलेला सहभाग हे या रागाचेच प्रतिक आहे. राज्यात भाजपची सत्ता असून बोम्मई सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहे. ‘४० टक्के कमिशनचे सरकार’ अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. ४० टक्के कमिशन घेतल्याशिवाय कुठलेच काम केले जात नाही. आता तर ५० टक्के कमिशन घेतले जात असल्याचा आरोप होत आहे. सरकारच्या या खाबुगिरीचा बेळगावातील एक कंत्राटदार बळी ठरला. कमिशनसाठी बिले अडकवून ठेवल्याने तो आर्थिक अडचणीत आला आणि त्याने आत्महत्त्या केली. याबाबत त्याने के. एस. ईश्वरप्पा या मंत्र्यावर थेट आरोप केला होता. ईश्वरप्पा यांना आता घरी बसावे लागले आहे. सरकारच्या भ्रष्टाचाराला लोक वैतागले असून त्यांच्या मनात असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर रमाकांत कोंडुसकर यांच्या पदयात्रेला मिळालेल्या प्रतिसादाकडे पाहाता वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत हे लक्षात येते.

बेळगाव दक्षिण मतदार संघातील ही निवडणूक सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार असे दिसते. रमाकांत कोंडुसकर यांनी आपल्या सामाजिक कामातून जोडलेले कार्यकर्ते आणि सीमा चळवळीत असलेले कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे कोंडुसकरांचे बळ वाढले आहे. याचाच परिणाम म्हणून की काय कोण जाणे या मतदार संघातील मुसलमान बांधव, दलित बांधव तसेच ज्यांना भाजपला हरवायचे आहे असे छोटे छोटे घटक समितीकडे आकर्षिले जाताना दिसतात. अशा प्रकारे सुरूवात तर चांगलीच दमदार झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर भाजपचा सहजपणे पराभव करतील असे म्हणावयास हरकत नाही.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *