बेळगाव : राजहंसगड येथील शिवाजी गल्लीत मागील बारा दिवसापासून पाणी पुरवठा झाला नसल्याने आज ग्रामपंचायत विकास अधिकारी दुर्गाप्पा तहसीलदार यांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. मुबलक प्रमाणात पाणीसाठा असूनही ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. गावातील इतर गल्ल्यांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित केला जातो, परंतु शिवाजी गल्लीमध्ये पाणीपुरवठा सुरळीत का होत नाही? असा सवाल येथील जनतेतून करण्यात आला. पाण्याअभावी जीवन कसे जगावे. आज या पाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याच ठिकाणी पाण्याची सोय नाही. जनावरांसाठी, वावरासाठी व नागरिकांना पिण्यासाठीही या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. मागील बारा दिवसापासून आज सोडतो उद्या सोडतो असे थातूरमातूर उत्तरे देऊन नागरिकांना वेळ मारण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु आज सकाळी सात वाजता गल्लीतील सगळे नागरिक एकत्र जमून पंचायत अधिकारी व पंचायत सदस्यांना जाब विचारला. तरी ग्रामपंचायतीने योग्य नियोजन करून सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta