बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून व रमाकांत कोंडुस्कर यांच्या सहकार्याने शनिवारी शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मोफत मेकअप (रंगभूषा) करण्यात आली. या सुविधेला कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोवावेस येथील कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
शुक्रवारी वडगाव भागात झालेल्या चित्ररथ मिरवणुकीतील १७० हून अधिक कलाकारांना मेकअप करण्यात आला होता. शनिवारी झालेल्या चित्ररथ मिरवणुकीतील २०० हून अधिक कलाकारांचा मेकअप करण्यात आला. या दोन दिवसांत ३७० हून अधिक जणांनी मोफत मेकअपचा लाभ घेतला. या मोफत मेकअप सुविधेमुळे कलाकारांतून समाधान व्यक्त होत आहे. स्थानिक कलाकारांना वाव मिळावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. दोन वर्षांपासून ही सुविधा पुरविली जात आहे. शहरातील वैभवशाली चित्ररथ मिरवणुकीत शिवरायांचा जिवंत इतिहास साकारला जातो. यासाठी पेहराव आणि मेकअपला विशेष महत्त्व असते. उकृष्ट सादरीकरणासाठी मेकअपही महत्त्वाचा आहे. या दृष्टिकोनातून कलाकारांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मोफत मेकअप उपक्रम राबविण्यात आला. शहरात ६४ हून अधिक चित्ररथ मंडळे आहेत. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या कलाकारांना मोफत मेकअप करण्यात आला.
काही शिवभक्तांनी नैसर्गिक केशभूषा केली आहे. अशा कलाकारांनी शिवराय, अफजलखान, औरंगजेबची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासाठीही विशेष रंगभूषा करण्यात आली. इतर ठिकाणी युवक मंडळांनी आणि स्वतः कलाकारांनी मेकअप करून घेतला. विशेषत: मेकअपसाठी युवतींचे मोठे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta