बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, श्रीराम सेना हिंदुस्तान तसेच अन्य संघटनांतर्फे आज मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक दिन शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्याद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.
एसपीएम रोड शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानमध्ये आज सकाळी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, समितीचे युवानेते व श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आदी मान्यवरांच्या हस्ते उद्यानातील सिंहासनारूढ पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. तसेच आरती करून शिवरायांना आदरांजली वाहण्याबरोबरच अभिवादन करण्यात आले.
आरती नंतर पुण्यश्लोक छ. शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी असा महाराजांचा जयजयकार करण्यात आला.
याप्रसंगी प्रकाश मरगाळे, समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, नेताजी जाधव, भाऊराव कातकर, मदन बामणे, शिवराज पाटील, श्रीकांत कदम, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अमर येळ्ळूरकर, अंकुश केसरकर, अनिल अमरोळे, गणेश दड्डीकर, वासू सामजी, उमेश पाटील, किरण हुद्दार, विक्रम पाटील, राजू बिरजे, प्रशांत भातकांडे आदींसह समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते आणि शिवभक्त उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta