बेळगाव : वडगाव येथील श्री मंगाई देवस्थानाकडून रस्त्यावर केल्या जाणाऱ्या बांधकामामुळे मंगाईनगर रहिवाशांचा आपल्या घरी ये -जा करण्याचा मार्ग बंद झाला आहे. तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवावे आणि रस्ता नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी मंगाईनगर, वडगावच्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मंगाईनगर वडगाव येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर प्रशांत हानगोजी, श्रीधर बिर्जे, किरण पाटील, आनंद गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली तेथील रहिवाशांनी आज शुक्रवारी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
वडगाव येथील मंगाईनगर येथे सुमारे 500 घरे आहेत. या वसाहतीला शहराशी सोडणारा रस्ता श्री मंगाई देवस्थाना जवळून जातो. मंगाईनगर येथील रहिवासी शहरात ये-जा करण्यासाठी गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून या रस्त्याचा वापर करत आहेत. मात्र अलीकडच्या काळात या रस्त्यावर श्री मंगाई देवस्थान कमिटीकडून अनाधिकृत बांधकाम केले जात आहे. सदर रस्ता शहर सुधारणा योजनेच्या (सीडीपी) नकाशावर देखील दाखविण्यात आला आहे. या पद्धतीने रस्ता अधिकृत असून देखील अतिक्रमण करून रस्त्याच्या जागेवर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर रस्त्याखेरीज आपल्या घरी जाण्यासाठी मंगाईनगर येथील रहिवाशांना दुसरा पर्यायी रस्ता नाही. ही परिस्थिती असताना सदर रस्त्यावर भिंत बांधून अनाधिकृत बांधकाम केले जात आहे. त्यामुळे मंगाईनगर येथील रहिवाशांना ये -जा करणे कठीण झाले आहे. रस्त्यावरील सदर अनाधिकृत बांधकामाविरुद्ध यापूर्वी अनेकदा आवाज उठवून देखील ते न थांबता सुरूच आहे. परिणामी मंगाईनगर येथील रहिवाशांना सुलभपणे घरी पोहोचता येत नसल्यामुळे ते हतबल झाले आहेत असेही त्यांनी म्हटलं आहे.
तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन श्री मंगाई देवस्थानाने रस्त्यावर सुरू केलेल्या अनधिकृत बांधकामाला तात्काळ पायबंद घालावा आणि आमचा रस्ता आम्हाला खुला करून द्यावा ही कळकळीची विनंती, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी मंगाईनगर, वडगाव येथील बहुसंख्य स्त्री -पुरुष रहिवाशी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta