बेळगाव : बेळगाव हा शांतिप्रिय प्रदेश आहे. त्याला गालबोट लागू देऊ नका, सर्वानी मिळून मिसळून राहा, त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी त्यांच्या निरोप समारंभात केले.
राज्य सरकाने आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांची अन्यत्र बदली केली आहे. बेळगावच्या पोलीस आयुक्तपदाची गेली दीड वर्ष समर्थपणे धुरा संभाळणारे डॉ. बोरलिंगय्या यांनादेखील आयजीपी पदी बढती देऊन त्यांची म्हैसूर येथे बदली करण्यात आली आहे. बेळगावच्या जिरगे समागृहात त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या निरोप समारंभात जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर, डीसीपी शेखर एच पी, लोकायुक्त एस पी महानंद नंदगावी, डीसीपी पी. व्ही. स्नेहा, केएसआरपी एसपी हंजा हुसेन यांनी तसेच शहरातील विविध समाजाचे प्रमुख, संघटनेचे प्रमुख, डॉ. बोरलिंगय्या यांच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी जिल्हा पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तसेच विविध संघटनांच्या वतीने डॉ. बोरलिंगय्या यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सरकारी नोकरीत सरकारचा आदेश अनिवार्यपणे पाळावेच लागतो. बदली हा सेवेचा एक भाग आहे. डॉ. बोरलिंगय्या यांनी गेली दीड वर्षे शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखली आहे. शिवजयंती, गणपती विसर्जन, निवडणुका, राजकीय कार्यक्रम, मोदींच्या रोड शो दरम्यान त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. आम्हीदेखील त्यांच्यासोबत सर्वानी मिळून शहराच्या आणि जिल्ह्याच्या हितासाठी काम केले आहे. बंगळूरमध्ये मी त्यांच्यासोबत काम केले आहे बोरलिंगय्या हे अतिशय हुशार आणि शिस्तप्रिय अधिकारी आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
सत्कार स्वीकारून बोलताना डॉ. बोरलिंगय्या म्हणाले की, बेळगाव शहरात मागील दीड वर्षात काम करत असताना सर्वांचे सहकार्य लाभले. सर्व समाजाचे लोक एकजुटीने राहत असून ते आपल्या समस्या अगदी बिनदिक्कत आमच्यासमोर मांडत होते. या काळात अनेक बंदोबस्त ठेवावे लागले. संपूर्ण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मोदींचा रोड शो, जयंती मिरवणूका आणि अन्य कार्यक्रमावेळी शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश मिळाले. इथे काम केल्याचे समाधान आहे. म्हैसूरला गेलो तरी इथे येऊन नक्की भेट देईन. आपलं शहर शांत ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सीएआरसी सिध्दनगौडा पाटील, डीसीपी बरमनी, सदाशिव कट्टीमनी तसेच विविध समाजाचे प्रमुख उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta