बेळगाव : शेतजमिनीच्या वादातून बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथे गुरुवारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी 50 जणांच्या टोळक्याने तलवारी, लाठ्या, काठ्यांनी मारहाण केल्याने दुसऱ्या गटातील 10 जण जखमी झाले. त्यामुळे गावात काहीवेळ तणावाचे वातावरण होते. केवळ मारहाणच नव्हे तर भात पेरणी केलेली शेती ट्रॅक्टरने नांगरली. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
पुंडलिक नागो सावंत (वय 47), राजू नागो सावंत (वय 42), जोतिबा नागो सावंत (वय 45), अभिषेक पुंडलिक सावंत (वय 24), सुनीता पुंडलिक सावंत (वय 42), कविता राजू सावंत (वय 40), वनिता जोतिबा सावंत (वय 40), कार्तिक राजू सावंत (वय 15), श्रीराज सावंत (वय 12) आणि विघ्नेश्वर सावंत (वय 12 सर्वजण बेकिनकेरे) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, बेकिनकेरेतील सर्व्हे नंबर 85/1 आणि 85/2 मधील 9 एकर 30 गुंठे जमिनीचा वाद अनेक वर्षापासून न्यायप्रविष्ठ आहे. दोन गटाच्या वतीने या जमिनीवर दावा केला जात आहे. सावंत कुंटुबीयांकडे जमिनीचा ताबा आहे. त्यामुळे गुरुवारी ते भात पेरणी करण्यासाठी शेतावर गेले होते. त्यावेळी 50 जणांचे टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी वाद घालत तलवारी, काठ्या-काठ्यांनी मारहाण, केल्याने दुसऱ्या गटातील 10 जण जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी काकती पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
Belgaum Varta Belgaum Varta