बेळगाव : मान्सून लांबणीवर पडल्यामुळे राकसकोप जलाशयाने तळ गाठला आहे. त्यामुळे बेळगांव शहराला राकसकोप जलाशयातील मृत साठ्यातील पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मृत साठ्यातील पाणी शुद्धीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मनपा आयुक्त अशोक दूडगंटी यांनी पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. राकसकोप जलाशयातील पाणीसाठा कमी असल्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्यामुळे शहराला दहा दिवसा ऐवजी बारा दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय एल अँड टी कंपनीने घेतला आहे.
शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एल अँड टी कंपनीकडून पाण्याचे टँकर पुरवले जात आहेत. मात्र ते लोकसंख्येच्या तुलनेने कमी पडत आहेत. त्यामुळे दैनंदिन गरजा भागविण्यासाठी जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून 20 लिटर पाण्यासाठी 50 ते 60 रुपये मोजावे लागत आहेत. खासगी टँकरचे दर देखील वधारले आहेत तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत प्रति टँकर मिळणारे पाणी आता 800 ते हजार रुपये पर्यंत एक टँकरला मोजावे लागत आहेत. कुपनलिका व विहिरीतून पाणी मिळविण्यासाठी खासगी टँकर मालकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta