
बेळगाव : बेळगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व तयारी करावी, तसेच उत्सव मंडळांना विनाविलंब एक खिडकी योजनेतून परवानगी देण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गणेशोत्सवानिमित्त महापालिकेच्या सभागृहात आज सोमवारी (७ ऑगस्ट) झालेल्या प्राथमिक सभेच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज देण्याकडे शासनस्तरावर लक्ष दिले जाणार आहे. मंडळांना काही समस्या असतील तर त्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, त्या सोडवल्या जात नसतील तर मला निदर्शनास आणून द्याव्यात, असेही ते म्हणाले.
गणेशोत्सव मंडळांनीही नियोजित वेळी मिरवणुकीत सहभागी होऊन लवकरात लवकर विसर्जनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व तयारी सुरू आहे. रस्त्यांची दुरुस्ती, वीजवाहिन्या दुरुस्ती करणे, पोलिस बंदोबस्त व इतर आवश्यक पावले उचलण्यात येणार आहेत. मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी अधिकाधिक महिला स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत असेही त्यांनी सांगितले.
महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी, दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात येणार आहे असे सांगितले.
गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी विकास कलघटगी यांनी शहरातील ३७८ गणेशोत्सव मंडळे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत आहेत. मंडळांना वीज बिलात सवलत द्यावी. शक्य असल्यास संपूर्ण बिल माफ करण्याबाबत शासनस्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.
नेताजी जाधव यांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी विहिरीची व्यवस्था करावी. विद्युत दिवे लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी पावले उचलावीत, अशी विनंती केली.
रमाकांत कोंडुस्कर यांनी गणेश मंडळांना मोफत वीज बिल देण्याबरोबरच परवाना प्रणाली सुलभ करावी, अशी मागणी केली.
मल्लेश चौगले, सागर पाटील आदींनी सूचना केल्या.
बैठकीला उपस्थित अनेकांनी म्हैसूर दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मिरवणूक काढण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत; रस्त्यांची दुरुस्ती, विद्युत दिवे बसवणे, पडलेल्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती; गणेश विसर्जनासाठी अतिरिक्त व्यवस्था आदीसह अन्य मागण्या करण्यात आल्या.
महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, आमदार आसिफ (राजू) सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर आदी उपस्थित होते.
मल्लेश चौगले, सागर पाटील आदींनी सूचना केल्या.
या बैठकीत बेळगाव शहरातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, महानगर पालिकेचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta