
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण बैठकीत पुन्हा एकदा मराठी भाषिकांवर प्रशासनाने दडपशाही केल्याचे दिसून आले आहे. बैठकीची नोटीस मराठीतून न दिल्यामुळे तसेच नोटीस घरावर चिकटवून गेल्याच्या विरोधात मराठी भाषिक नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी मराठी भाषिक भाजप नगरसेवकांनी मात्र मराठी भाषिक नगरसेवकांच्या मागणीकडे पाठ फिरविली. तर विरोधी पक्षातील इतर नगरसेवकांसह उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी मराठी भाषिक नगरसेवकांच्या पाठीशी राहून मराठीतून कागदपत्रके देण्यात यावी, अशी मागणी केली.
महापौरांच्या आसनासमोरच रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे या मराठी नगरसेवकांनी ठिया आंदोलन केल्यामुळे महापौरांचा अवमान झाला असे सांगत मराठी नगरसेवकांना बाहेर जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र जोपर्यंत आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत आपण ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला. त्यानंतर उत्तरचे आमदार राजू शेठ यांनी मराठी नगरसेवकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या असे सांगत त्यांना त्यांच्या आसनावर बसण्याची विनंती केली. तसेच महापौर शोभा सोमनाचे यांनी सत्ताधारी नगरसेवकांचे बोलणे अगोदर संपू देत मगच विरोधी पक्षाने बोलावे असे सांगत उत्तरच्या आमदारांना गप्प केले.
महानगरपालिकेच्या आजच्या सभेत महापौर शोभा सोमनाचे यांच्या सूचनेनुसार नाडगीत वाजविण्यात आले. त्यामुळे मराठी भाषिक नागरिकातून तीव्र नाराजी पसरली आहे.
आजच्या सर्वसाधारण बैठकीत सत्ताधारी नगरसेवक व विरोधी पक्षाचे नगरसेवक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. यावेळी नागरिकांशी एकेरी बोलणे योग्य नाही आधी आदर राखायला शिकावे, असा सल्ला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी दिला. त्याचबरोबर मराठी भाषेतून कागदपत्रे किंवा बैठकीची नोटीस देण्याची कायद्यात तरतूद आहे का? या विषयावर बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ आणि बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यात शाब्दिक बचावाची झाली. त्यानंतर महापौर शोभा सोमनाचे यांनी मध्यस्थी करून हा वाद संपविण्याचा प्रयत्न केला तर कानडी भाषेशिवाय इतर भाषेत परिपत्रके देता येणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र मराठी भाषेतून बैठकीची नोटीस देण्याची यापूर्वीपासूनची महानगरपालिकेची परंपरा असल्याचे मराठी नगरसेवकांनी सांगितले. महापौर शोभा सोमनाचे आणि कन्नड भाषेमध्ये सभेच्या कार्यसुचीचे वाचन केल्यामुळे मराठी भाषिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta