बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे शहरातील श्री गणेशोत्सव मंडळांच्या विजेसंदर्भातील विविध समस्या व मागण्यांचे निवेदन शनिवारी नेहरूनगर येथील हेस्कॉम सहाय्यक अभियंता कार्यालयांमध्ये विद्युत अदालतीमध्ये हेस्कॉमच्या सहाय्य कार्यकारी अभियंत्यांना सादर करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, सागर पाटील, आनंद आपटेकर तसेच अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री गणेशोत्सव काळात वीज पुरवठा व विज बिल यासंदर्भात उद्भवणाऱ्या समस्यांची माहिती देऊन त्याचे निवारण करण्याची विनंती केली. तसेच काही सूचना देखील केल्या. शहरातील बहुतांश सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ हे नोंदणीकृत आहेत मात्र गेल्यावर्षी गणेशोत्सव काळातील मंडपाच्या विद्युत रोषणाईची विज बिले मंडळाच्या नावावर न काढता मंडळाच्या अध्यक्षांच्या नावे त्यांच्या घरच्या वीज बिलात समाविष्ट केले गेले होते. त्यामुळे मंडळांना तसेच अध्यक्षांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. तेव्हा कृपया सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या विद्युत रोषणाईच्या विजेचे बिल अध्यक्षांच्या नावे न काढता संबंधित मंडळाच्या नावे स्वतंत्र काढले जावे, अशी विनंती हेस्कॉम अधिकाऱ्यांशी चर्चा करतेवेळी पदाधिकाऱ्यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta