बेळगाव : कोरोनामुळे गेली दोन वर्षे बेळगावात हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे यावर्षी बेळगावच्या सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाचा आयोजित करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील जनतेच्या महत्त्वाच्या समस्यांबरोबरच अतिवृष्टीने झालेल्या पिक हानी संदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोम्माई आज बेळगावला आले होते. रिजेंटा रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना बोम्माई म्हणाले, अतिवृष्टीने झालेल्या पिक हानी संदर्भात सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. पिक हानीचा सर्वे होताच शेतकर्यांना तात्काळ मदत देण्याची सूचना करण्यात आली आहे. शेती आणि बागायत पिकांच्या हानी संदर्भात कृषी विभागाला विशेष सूचना देण्यात आले आहेत. शेतकर्यांना नव्या पिकासंदर्भात प्रोत्साहित करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. सोमवार दि. 13 डिसेंबरपासून बेळगाव हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. जिल्हा प्रशासनाने हिवाळी अधिवेशनाची तयारी केली आहे. दोन्ही सभागृहांच्या सभापतींनी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची पाहणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या हिवाळी अधिवेशन संदर्भात उलट-सुलट चर्चा रंगल्या होत्या त्याला आम्ही पूर्णविराम दिला आहे. नियमांचे पालन करत बेळगावात हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाणार आहे. सुवर्ण सौध परिसरात आमदार निवास बांधण्यासंदर्भात सभापतीकडून आलेल्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही बोम्माई यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुख्यमंत्री बोम्माई यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली. विधान परिषद निवडणुकीत जेडीएस बरोबर युतीचा प्रश्नच नसल्याचे सांगितले. भाजपचे अधिकृत उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्या पाठीशी सर्व लोकप्रतिनिधी एकवटले आहेत. तिरंगी विधान परिषद निवडणुकीत कवटगीमठ निश्चित विजयी होतील, असा दावा केला. मात्र रमेश जारकीहोळी यांनी चालविलेल्या हालचाली संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळून मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
Check Also
वीरसौध येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण
Spread the love बेळगाव : महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याचा …