बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा अध्यादेश जाहीर झाला असून 11 सप्टेंबर रोजी कारखान्याच्या कार्यालयाच्या साडेअकरा वाजल्यापासून निवड प्रक्रिया सुरू होणार आहे.
सहकार खात्याच्या उपनिबंधक अधिकाऱ्यांनी सदर अध्यादेश जारी केला असून इच्छुकानी सकाळी 11 वाजता अर्ज भरून द्यावा अशी सूचना संचालक मंडळाला करण्यात आली आहे. या कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत तानाजी पाटील व आर. आय. पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलने पंधरापैकी दहा जागा मिळून विजय मिळविला आहे. या सत्ताधारी गटाचे तानाजी पाटील आणि आर. आय. पाटील हे दोघेही अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. दोघांपैकी कोणाची निवड होणार याकडे भागधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.
यापूर्वी तानाजी पाटील यांनी उपाध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे पार पाडली असून गेल्या तीन वर्षापासून कारखान्याचा गळीत हंगाम चालू झालेला आहे. शेतकऱ्यांचे ऊस बिल देण्यासाठी तानाजी पाटील यांनी श्री कलमेश्वर सोसायटीकडून ठेवीच्या स्वरूपात आर्थिक मदत केलेली आहे. तसेच शेअर्स देखील केलेले आहे तर आर. आय. पाटील यांनी निवडणुकीत पॅनेलच्या विजयासाठी परिश्रम घेतलेले आहेत. तानाजी पाटील व आर. आय. पाटील या दोघांचेही योगदान मोठे असल्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे भागधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta