Monday , December 8 2025
Breaking News

मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे नागरिकांना आवाहन : मंडळांनी मांडल्या विविध सूचना

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होतो. परंतु विसर्जन मिरवणुकीत मात्र मागील काही वर्षांपासून विस्कळीतपणा जाणवत आहे. आपला धर्म व संस्कृतीचे दर्शन घडविणारी विसर्जन मिरवणूक विस्कळीत का होतेय, हा विचार प्रत्येकानेच करायला हवा. महिला, लहान मुले, परगावचे नागरिक, मिरवणूक पाहण्यासाठी बेळगावमध्ये येतात. त्यामुळे प्रत्येक मंडळाने आपली जबाबदारी ओळखून विसर्जन मिरवणूक शिस्तबद्धरित्या पूर्ण करत लवकरात लवकर विसर्जन करावे, असे आवाहन मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी रविवारी आयोजित बैठकीत केले. मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाची व्यापक बैठक मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीत बेळगावमधील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना व आपल्या समस्या मांडल्या. व्यासपीठावर नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अंकुश केसरकर, शहापूर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, रणजित चव्हाण पाटील, महादेव पाटील, नगरसेविका वैशाली भातकांडे, विनायक गुंजटकर, रमेश सोनटक्की, अशोक चिंडक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संतोष कृष्णाचे म्हणाले, मागील वर्षी पोलिसांनी रात्री 12 नंतर चन्नम्मा चौकातून मंडळांना प्रवेश नाकारल्याने गणेशमूर्ती थेट धर्मवीर संभाजी चौकात आल्याने गर्दी झाली. त्यामुळे पोलिसांनी मिरवणुकीसाठी वेळापत्रक जाहीर करणे गरजेचे आहे. ढोल-ताशा पथकांनी एकाच ठिकाणी थांबवून वादन करू नये, अशी सूचना राजू बिर्जे यांनी केली. विसर्जनादिवशी महापालिकेने ई-टॉयलेटची व्यवस्था करण्याची मागणी सुनील देसूरकर यांनी केली. नेताजी जाधव यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना करत ज्या ज्यावेळी प्रशासनाकडून पाहणी होते, त्यावेळी शहापूर मध्यवर्ती महामंडळाला पूर्वकल्पना दिल्यास शहापूर, वडगाव, जुने बेळगाव येथील समस्या मांडणे सोयीचे होते. त्यामुळे महामंडळाने शहापूर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना द्यावी, अशी विनंती केली. नितीन खन्नूकर यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आवाहन केले. संजय शिंदे यांनी वेळेत विसर्जन करण्यासोबतच कन्नडसह मराठीमध्येही फलक लावण्याची सूचना केली. गणेश काळे, अशोक हलगेकर, योगेश गंगाणे यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

कामत गल्ली मंडळाचे कौतुक

गणेशोत्सव सणाला सामाजिक रुप देण्याची संकल्पना मागील काही वर्षांपासून रुजत आहे. यावर्षी 111 वे वर्ष साजरे करणाऱ्या कामत गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 111 युनिट रक्त संकलन करून सामाजिक उपक्रम राबविला. याची दखल घेत रविवारच्या बैठकीत महामंडळाच्यावतीने कामत गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.

 

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *