बेळगाव : श्री विश्वकर्मा जयंती येत्या 17 सप्टेंबरला असून राज्यात सरकारी कार्यालय वगैरे सर्व स्तरांवर ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जावी अशी मागणी श्री विश्वकर्मा जयंती उत्सव समिती, विश्वकर्मा सेवा संघ व श्री विश्वकर्मा समाजातर्फे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
श्री विश्वकर्मा जयंती समिती बेळगावचे अध्यक्ष राघवेंद्र हवनूर यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले. येत्या रविवार दि. 17 सप्टेंबर रोजी श्री विश्वकर्मा जयंती असून जिल्हा प्रशासनाने ती मोठ्या प्रमाणात साजरी करावी. स्वतः खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्याबद्दल सांगितले आहे. त्यासाठी राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, ग्रामपंचायती, सरकारी शाळा, अनुदानित शाळा वगैरे सर्व ठिकाणी ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जावी अशी श्री विश्वकर्मा जयंती उत्सव समिती, विश्वकर्मा सेवा संघ व श्री विश्वकर्मा समाज बेळगावची मागणी आहे. त्यासाठी तशा आशयाचे निवेदन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे, अशी माहिती निवेदन सादर केल्यानंतर श्री विश्वकर्मा जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. निवेदन सादर करतेवेळी ज्योती सुतार, रमेश देसुरकर, दिव्यश्री देसुरकर, रेणुका कणबरकर आदींसह श्री विश्वकर्मा जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.