बेळगाव : हिंदु-मुस्लिम ऐक्य, बंधूभाव कायम राहावा आणि विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न निर्माण होऊ नये यासाठी 1 ऑक्टोबरला ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बेळगावातील मुस्लिम समाजाने घेतला.
यंदा श्री गणेश विसर्जन मिरवणूक आणि मुस्लिम बांधवांची ईद-ए-मिलाद मिरवणूक एकाच दिवशी असल्याने गणेश विसर्जन मिरवणूकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न न येता पार पडावी या उद्देशाने 1 ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बेळगावातील मुस्लिम समाजाने घेतला.
सोमवारी रात्री अंजुमन हॉलमध्ये झालेल्या उलमा, जमात, अंजुमन कमिटी, सिरत कमिटी, यंग कमिटी, मुस्लिम बांधवाच्या बैठकीत चर्चा करून सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे सर्व थरातून स्वागत होत आहे.
गणेशोत्सवामुळे शहर आणि उपनगरात मंडळाकडून ठिकठिकाणी मंडप उभारले आहेत. विसर्जन मिरवणूक 28 आणि 29 सकाळपर्यंत चालते. मंडळाकडून 30 तारखेपर्यंत मंडप हटविले जातात. त्यानंतर मिरवणुक काढणे सोपे जाईल, तसेच कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही. त्यामुळे 27 आणि 28 रोजी मुस्लिम बांधवानी आपापल्या घरातच धार्मिक विधी पार पाडावेत. त्यानंतर रविवार, 1 ऑक्टोबरला शहरातील मुख्य मिरवणुकीला फोर्ट रोड येथून सकाळी सुरुवात होईल. त्यानंतर खिमजीभाऊ पेट्रोल पंप, मध्यवर्ती बसस्थानक, आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, यंदे खुट, कॅम्प मार्गेजाऊन आसदखान दर्गा येथे मिरणुकीची सांगता होईल. तर अनगोळ आणि वडगाव भागातील मिरवणुका देखील त्याच दिवशी होतील.
जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांशी चर्चा करणार
1992 मध्ये अशा प्रकारे गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद-ए-मिलादची मिरवणूक एकाच दिवशी आली होती. दोन्ही समाजाच्यावतीने काढलेल्या मिरवणुकीवेळी समस्या निर्माण झाली होती. खबरदारी म्हणून मुस्लिम बांधवांनी यावेळी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. आमदार राजू सेठ यांच्या नेतृत्वाखाली लवकरच जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta