
बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर” या अशा जयघोषात पारंपारिक ढोलताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यंदाची विसर्जन मिरवणूक तब्बल 30 तास चालली. गुरुवारी सायंकाळी चार वाजता हुतात्मा चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. हुतात्मा चौकात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती ती दिनांक 29 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास विसर्जित करण्यात आला. तत्पूर्वी माळी गल्लीतील गणेशोत्सव मंडळाने दुपारी एक वाजताच आपल्या मंडळाचा गणपती विसर्जन केला होता. गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी “पुढच्या वर्षी लवकर या” अशी साद घालत जल्लोषात पण तितक्याच भावपूर्ण वातावरणात भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. दुपारी एक वाजता माळी गल्लीच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जनस्थळी यंत्रणा सज्ज असून देखील मंडळाचे गणपती वेळेत न पोचल्यामुळे आयोजकांना श्रीमूर्तींची प्रतीक्षा करावी लागली. सायंकाळी मिरवणूक सुरू झाल्यानंतर एक एक गणपती विसर्जन स्थळी दाखल होऊ लागले. रात्री आठ नंतर संभाजी चौकात गणेश मंडळांचे कार्यकर्ते, गणेश भक्त तसेच विविध मंडळाच्या मूर्ती दाखल झाल्या आणि मिरवणुकीचा मार्ग गर्दीने फुलून गेला. पारंपारिक ढोलताशांच्या गजरासह डॉल्बीची ही साथ असल्याने तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. शहरातील सोमवार पेठ टिळकवाडी मंडळांनी आदर्श घालत डॉल्बीला फाटा देत मिरवणुकीमध्ये ह. भ. प. तुकाराम पवार धारवाडकर वारकरी विद्यापीठ खुपिरे कोल्हापूर येथील मुलांनी भजनी भारुड सादर केले. हुतात्मा चौकातून सुरुवात झालेली विसर्जन मिरवणूक रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, यंदे खूट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, टिळक चौक, रामलिंग खिंड गल्ली, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल मार्गे विसर्जन तलावापर्यंत ही मिरवणूक ढोल ताशा, टाळ मृदूगांच्या गजरात उत्साहात पार पडली. मिरवणुकीमध्ये विविध वाद्यांच्या व ढोल ताशाच्या तालावर अबाल वृद्धांसह तरुणांना थिरकायला लावले. यावेळी पोलीस आयुक्त रोहन जगदीश यांनी देखील ठेका धरला त्यामुळे तरुणांमध्ये पुन्हा जोश वाढला आणि बेधुंद होऊन तरुणाई थिरकु लागली. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती. याबद्दल प्रशासनाचे आणि महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तब्बल 30 तास चाललेल्या या मिरवणुकीचा महानगरपालिकेच्या गणपती विसर्जनाने सांगता करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta