
किणये : बहाद्दरवाडी गावची रिया कृष्णा पाटील हिने मंगळूर येथे झालेल्या राज्य पातळीवरील भालाफेक स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळविले आहे. तिची निवड राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली आहे. आज दि. १३ रोजी ती राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. यामुळे तिला विविध भागातून आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. रिया पाटील हिच्या वडिलांचे निधन झालेले आहे. तिची घरची परिस्थिती हलाखीची आहे. तिने कर्नाटक राज्य ज्युनियर ऍथलेटिक संघटना यांच्यावतीने मंगळूर येथे आयोजित करण्यात आलेल्या १६ वर्षाखालील वयोगटामध्ये भालाफेकमध्ये रौप्य पदक मिळविले आहे. तिला तिच्या खेळासाठी मदत व्हावी, यासाठी अजित पाटील बहाद्दरवाडी ५ हजार रुपये, महाराष्ट्र एकीकरण समिती युवा नेते आर. एम. चौगुले ५ हजार रुपये आदींनी आर्थिक सहाय्य केले आहे. याचबरोबर टिळकवाडी येथील मित्रपरिवार व विनायक लोकूर यांच्यावतीने ९ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. यावेळी फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर, वाय. पी. नाईक आदी उपस्थित होते. रिया ही ज्योती हायस्कूल कर्लेची विद्यार्थिनी असून तिला क्रीडा शिक्षक अनंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रियाला फेसबुक फ्रेंड सर्कल व विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta