
बेळगाव : कर्नाटक-तामिळनाडूच्या सीमेवरील अत्तीबेले येथे गोदामात फटाके उतरविताना घडलेल्या आग दुर्घटनेत १५ जणांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण राज्यात खबरदारी घेण्यात येत आहे. बेळगावतही पोलिसांनी बेकायदा फटाके विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. गणेशपूर येथे ९ लाखांचे फटाके जप्त करण्यात आले आहेत.
गणेशपूर येथील व्यापाऱ्याने मागवलेले वेगवेगळ्या प्रकारच्या फटाक्यांचे ३१ बॉक्स कॅम्प पोलिसांनी बुधवारी रात्री जप्त केले आहेत. कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून यासंबंधी यश सुनील अस्वले (वय २१) या व्यापाऱ्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
फटाके साठविण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी तत्सम प्राधिकरणाकडून परवानगी न घेता आणि कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेची काळजी न घेता फटाके साठविण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या दुकानातील ८ लाख ९७ हजार ८२० रुपये किमतीचे फटाके जप्त करण्यात आले आहेत. टिळकवाडी परिसरातील एका लायसन्स धारकाचा मृत्यू झाला आहे. लायसन्सची मुदत देखील संपली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta