बेळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र – कर्नाटक सीमापश्नी आज बुधवार दि. १ नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायाधीश रजेवर असल्यामुळे पुन्हा लांबणीवर पडली आहे. कर्नाटकचे कायदामंत्री एच. के. पाटील यांनी पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या खटल्यासाठी खंडपीठाची त्रिसदस्यीय रचना करण्यात आली आहे. मात्र सातत्याने महाराष्ट्र किंवा कर्नाटकातील न्यायमूर्तींची खंडपीठात नियुक्ती करण्यात येत होती. त्यामुळे ही सुनावणी झालेली नाही. या खटल्यासाठी न्यायालयात तटस्थ न्यायमूर्ती नेमावेत अशी मागणी सुरू होती. या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीने सातत्याने महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावाही केला होता.
त्यानुसार आज बुधवारी ही सुनावणी होणार होती. आता दोन महिन्यांनी म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये ही सुनावणी होऊ शकते. खटल्यासाठी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय खंडपीठात महाराष्ट्रातील न्यायमूर्ती नसल्यामुळे सुनावणीला गती मिळेल असा विश्वास महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्यक्त करण्यात येत होता मात्र कर्नाटकच्या कायदा मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन एक नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी पुढे गेली असून जानेवारी महिन्यात सुनावणी होणार आहे त्यामुळे कर्नाटकला आपली बाजू मांडण्यासाठी अधिक वेळ मिळणार असल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta