
फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
बेळगाव : महाराष्ट्रात मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी बेळगावात रविवार, दि. ५ रोजी सायंकाळी ६ वाजता कँडल मार्च काढण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. छत्रपती शिवाजी उद्यान ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या दरम्यान कँडल मार्च होणार असून मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. ही बैठक गुरुवारी जत्तीमठ येथे पार पडली.
प्रास्ताविक शिवराज पाटील यांनी केले. मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले, मराठा आरक्षणावर तातडीने अधिवेशन घेवून कार्यवाही करणे आवश्यक आहे. चार दिवसापूर्वी आम्ही जरांगे -पाटील यांची भेट घेवून पाठिंबा दर्शवून चर्चा केली आहे. आरक्षणासाठी जरांगे – पाटील यांची भूमिका मराठा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी आगामी काळात विविध संघटनांना एकत्र करून मराठा समाजाचा मोठा कार्यक्रम घेऊया, असे सांगितले. समिती नेते आर. एम. चौगुले यांनी जरांगे पाटील यांची रस्त्यावरची लढाई निःस्वार्थीपणे सुरू आहे. प्रामाणिकपणे काम केले की त्यामागे दैवी ताकद निर्माण होते, असे सांगितले.
चंद्रकांत कोंडुसकर, गुणवंत पाटील, मदन बामणे, संजय मोरे, रवी पाटील, ऍड. एम. जी. पाटील, दत्ता जाधव, गणेश दड्डीकर, रणजीत हावळाण्णाचे, मोतेश बारदेशकर, अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta