
बेळगाव : विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. २३) बेळगाव जिल्हा पदवीपूर्व महाविद्यालय कर्मचारी महामंडळ, पदवीपूर्व महाविद्यालय प्राचार्य संघ, पदवीपूर्व महाविद्यालय प्राध्यापक संघ, पदवीपूर्व महाविद्यालय क्रीडाशिक्षक संघ आणि पदवीपूर्व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सदर मागण्यांची पूर्तता न झाल्यास संघटनेतर्फे १ डिसेंबर रोजी बंगळूर येथील फ्रीडम पार्कवर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
पदवीपूर्व शिक्षण खात्याचे शालेय शिक्षण खाते असे न करता पूर्वीसारखेच पदवीपूर्व शिक्षण खाते असे कायम ठेवण्यात यावे. कर्नाटक पब्लिक स्कूल या नावाने पदवीपूर्व विभाग माध्यमिक शाळांमध्ये विलिनीकरण करण्याची प्रक्रिया थांबविण्यात यावी. सरकारने कोणत्याही शिक्षक संघाशी चर्चा किंवा विचारविनिमय न करता घेतलेला आणि गुणी विद्यार्थ्यांना अन्यायकारक ठरणारा पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी तीन परीक्षा घेण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. शिक्षण खात्याच्या प्रारंभिक स्तरावर ५०० सरकारी महाविद्यालये होती. सध्या या महाविद्यालयांची संख्या ५०११ झाली असून विद्यार्थ्यांची संख्याही २० पटीने वाढली आहे. यामुळे सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दृष्टीने रिक्त जागांची भरती करावी, या व अन्य मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी पदवीपूर्व महाविद्यालय कर्मचारी महामंडळाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष डी. वाय. हन्नूर, सचिव एस. वाय. शानवाड, पदवीपूर्व महाविद्यालय प्राचार्य संघाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष पी. एस. कांबळे, सचिव वाय. एम. पाटील, पदवीपूर्व महाविद्यालय प्राध्यापक संघाचे अध्यक्ष आर. बी. मठ, सचिव डॉ. एन. बी. मरेणावर, पदवीपूर्व महाविद्यालय क्रीडाशिक्षक संघाचे अध्यक्ष पी. डी. शिवनायकर, सचिव एम. उप्पीन, पदवीपूर्व महाविद्यालय प्राध्यापकेत्तर कर्मचारी संघाचे अध्यक्ष गिरीश कबटे, सचिव एस. एस. मज्जगी यांच्यासह अन्य प्राध्यापक उपस्थित होते. तत्पूर्वी, येथील सरदार्स हायस्कूल मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta