बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रयत भवन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय रयत संघ बेळगाव शाखेने केली आहे. शेतकरी नेत्यांनी किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर गुरुवारी (ता. २३) धरणे धरुन आपल्या मागणीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
सार्वजनिक बांधकाम खात्याने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील इमारतीमध्ये शेतकऱ्यांना रयत भवनासाठी म्हणून जागा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना सभा, बैठका, विश्रांतीसाठी, तसेच शेतकरी प्रशिक्षण केंद्र, शेती उत्पादनाचा साठा करणे, माती परीक्षण केंद्र, बियाणे-खते संग्रह केंद्र, शेती अवजारे संग्रह करणे असे उपक्रम राबविण्यास ही जागा अनुकूल आहे. मात्र, या जागेवर टी स्टॉल, हॉटेल, लॉज असे अनेक व्यापारी गाळे सुरु आहेत. रयत भवनाची जागा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अनेकदा करण्यात आली.
दरम्यान, खात्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा आदेशही दिला आहे. तरीही खात्याचे अधिकारी आदेशाची दखल घेत नसल्याची तक्रार आंदोलनकर्त्या शेतकरी नेत्यांनी केली. यापुढेही शेतकरी भवन उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला. आंदोलनात प्रकाश नायक, सोमू रैनापुरे, सुरेश मरिक्काचे, चुन्नप्पा पुजेरी, सुरेश वाली, सुरेश संपगावी आदी शेतकरी नेत्यांचा समावेश होता.
Belgaum Varta Belgaum Varta