मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची टीका
बेळगाव : हिवाळी अधिवेशन विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सरकार सक्षम आहे. या अधिवेशनात विविध प्रश्नांसह उत्तर कर्नाटकातील समस्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय सर्व सहमतीने घेण्यात आला आहे. दरम्यान विरोधी पक्ष अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजाचा वेळ वाया घालवत आहेत. जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्या ऐवजी विरोधी पक्ष हटवादी भूमिका घेत आहेत. विरोधकांची ही भूमिका उत्तर कर्नाटकातील जनतेशी द्रोह असल्याची टीका, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.
अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात विधानसभेत भाजप आमदार विजयेंद्र यांनी बेळगावातील भाजप कार्यकर्ते पृथ्वी सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे, यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी गृहमंत्र्यांच्या अनुपस्थितीत संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी विजयेंद्र यांच्या प्रश्नाला गृहमंत्री निश्चितपणे उत्तर देतील असे स्पष्टीकरण दिले.
मात्र विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय द्यावा असा आग्रह धरला. सभापतींच्या आसनासमोर जाऊन विरोधी पक्षातील आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विरोधी पक्षांच्या भूमिकेमुळे सभापती खादर यांनीही नाराजी व्यक्त केली.
दरम्यान विरोधी पक्षाच्या आमदारांच्या धोरणावर टीका करताना सिद्धरामय्या म्हणाले, भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री निश्चितच उत्तर देणार आहेत. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विरोधी विरोधकांनी कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तात्काळ स्पष्टीकरण देण्याची केलेली मागणी अवाजवी आहे. नियमानुसार उत्तर देण्यासाठी दोन दिवसांचा अवधी आहे. मात्र तरीही गृहमंत्री सभागृहात उपस्थित होताच तात्काळ यावर आपले उत्तर देतील, असे असतानाही विरोधक सभागृहाचा वेळ वाया घालवत आहेत. उत्तर कर्नाटकातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यास विरोधक टाळाटाळ करत आहेत. विरोधकांची ही भूमिका उत्तर कर्नाटकातील जनतेच्या विरोधात असल्याचे टीकाही सिद्धरामय्या यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta