बेळगाव : आपल्या मुलीला पळवून नेले म्हणून त्या मुलाच्या आईला विवस्त्र तसेच मारहाण करुन खांबाला बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना न्यू वंटमुरी (ता. बेळगाव) येथे रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून या निंद्य कृत्याची दखल गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनीही घेतली आहे. या घृणास्पद घटनेप्रकरणी सात जणांना काकती पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित आरोपी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष बसाप्पा नाईक यांच्या मुलीचे गावातीलच एका तरुणाबरोबर प्रेम होते. मात्र या प्रेमाला तरुणीच्या कुटुंबियांकडून विरोध होता. या प्रकरणी तरुणीचे वडील बसाप्पा नाईक यांनी प्रेम करणाऱ्या तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर मुलीच्या घरचे तिच्याविरोधात जाऊन हुक्केरी तालुक्यातील एका राजकीय व्यक्तीच्या मुलाबरोबर विवाह लावून देण्याच्या बेतात होते. यासाठी रविवारी त्यांचा साखरपुडा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मनाविरुध्द विवाह होत असल्याने मुलगी प्रियांका (वय १९) व प्रियकर ढुंडाप्पा (वय २४) यांनी रविवारी घरामध्ये कोणालाही सुगावा लागू न देता पलायन केले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबियांनी रविवारी रात्री १२ च्या सुमारास प्रियकर दुंडाप्पा याच्या घरावर हल्ला केला.
घरातील भांडी व अन्य साहित्य विस्कटले. शिवाय घरावर दगडफेक करत कौले फोडली. सदर महिलेचा पती ट्रकचालक असल्याने तो मुंबईला गेला आहे. घरी सदर महिला व सासू दोघेच होते. सुमारे ८ ते १० पुरूष व सहा-सात महिलांनी सदर महिलेच्या घराजवळ जाऊन तिला आमची मुलगी कुठे आहे, अशी विचारणा केली. यावेळी तिने आपल्याला काहीही माहिती नाही, असे सांगितले. शिवाय वृद्धादेखील त्यांना सांगत होती की ते कुठे गेले आहेत आम्हाला काहीच माहिती नाही. परंतु, त्यांचे काहीही न ऐकता साहित्य विस्कटत व दगडफेक करत सदर महिलेला घराबाहेर ओढत आणले व तिला विवस्त्र केले. यावेळी येथील अन्य लोकदेखील जागे झाले होते. परंतु, त्यांनी विरोध केला नाही. तेथून सुमारे १०० मीटरपर्यंत विवस्त्र नेत तिला एका खांबाला बांधून मारहाण केली.
सात जणांना अटक
ही घटना काकती पोलिसांना समजल्यानंतर रात्रीच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमी महिलेला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सोमवारी रात्री व सकाळी देखील पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, डीसीपी रोहन जगदीश यांनी भेट दिली. याबाबत माध्यमांशी बोलताना आयुक्त म्हणाले, घडलेली घटना निंदनीय आहे. परंतु, यामध्ये पोलिसांनी कसलीही कसूर ठेवलेली नसून या प्रकरणात सहभागी झालेल्या सात जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गावात पोलिस वाहनासह केएसआरपी व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.