बेळगाव : येथील सुवर्ण विधानसभा येथे चार डिसेंबरपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाची आज शुक्रवारी सांगता झाली.10 दिवस झालेल्या या अधिवेशनात एकूण 66 तास 10 मिनिटे विधानसभेचे कामकाज चालले
अधिवेशनाच्या कामकाजासंदर्भात पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष यु.टी. खादर म्हणाले, दहा दिवस चाललेल्या हिवाळ्यातील सतरा विधेयकांना मंजुरी मिळाली. राज्याबरोबरच विशेषता उत्तर कर्नाटकातील समस्यांवर अधिवेशनात सर्वसमावेशक चर्चा करून निर्णय घेण्यात आले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निधन झालेल्या मान्यवरांच्या स्मरणार्थ शोकप्रस्ताव मांडण्यात आला.
अधिवेशनात वकीलांचे संरक्षण,विनियोग विधेयकासह एकूण 17 विधेयके मांडण्यात आली आणि ती मंजूर करण्यात आली. राज्यातील 4 विमानतळांना राष्ट्र पुरुषांचे नाव देण्याची शिफारस करणारा अधिकृत ठराव आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बेळगावात स्मारक उभारण्याबाबतचा खासगी सदस्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला. 2023-24 या वर्षासाठी कर्नाटक विधानमंडळाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणावरील समितीचा पहिला आणि अंतरिम अहवाल आणि सार्वजनिक उपक्रमांवरील समितीचा एकशे छत्तीसवा अहवाल, खाजगी समितीचा पहिला अहवाल 2023-24 या वर्षासाठी कर्नाटक विधानसभेच्या सदस्यांची विधेयके आणि ठराव सभागृहात सादर करण्यात आले आहेत, एकूण 09 अधिसूचना, 03 अध्यादेश आणि 61 वार्षिक अहवाल, 105 लेखा परीक्षण अहवाल आणि 01 लेखापरीक्षण अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. राज्य ग्रंथालय प्राधिकरणासाठी चार सदस्य नामनिर्देशित करण्यासाठी अधिकृत केले.उत्तर कर्नाटकच्या विकासावर सभागृहात विशेष चर्चा झाली, एकूण 42 सदस्यांनी 11 तास 04 मिनिटे चर्चा केली. त्याचबरोबर दुष्काळावरही स्वतंत्रपणे दोन दिवस चर्चा पार पडली.
नजीकच्या काळात सुवर्णसौध जवळील प्रशस्त जागेत आमदार निवास बांधण्याबाबतही सरकारने चर्चा चालविली आहे. एकूण व्यवस्थेचा खर्च पाहता आमदार निवास पीपीपी अथवा अन्य धर्तीवर बांधण्याबाबत विचार केला जात आहे. नागरिकांना सुवर्णसौध परिसर पाहता यावा, यासाठीही जिल्हाधिकाऱ्यांना विशेष उपक्रम हाती घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या दहा दिवसात 27 हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी तर 14500 नागरिकांनीही अधिवेशनाच्या कामकाजाचा अनुभव घेतला असेही सभापती खादर यांनी यावेळी स्पष्ट केले.