बेळगाव : सौंदत्ती रेणुका मंदिर आणि परिसराचा विकास साधण्यासाठी रेणुका यल्लमा क्षेत्र पर्यटन विकास मंडळ विधेयक विधान परिषदेत संमत झाले आहे. त्यामुळे सौंदत्ती डोंगराच्या विकासासाठी लवकरच महामंडळ स्थापन केले जाणार आहे. यासह केंद्र सरकारकडे सौंदत्ती मंदिराला रेल्वेशी जोडण्यासाठी प्रस्ताव देखील पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान पर्यटन मंत्री एच. के. पाटील आज शनिवारी सकाळी सौंदत्ती श्री रेणुका मंदिराला भेट देणार आहेत.
हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत सौंदत्ती देवस्थानाच्या विकासाबाबत विधेयक संमत करण्यात आल्यानंतर त्यावर चर्चा झाली. देशात श्री रेणुका देवीचे लाखो भाविक आहेत. त्यांना देवीचे दर्शन सोयीस्कर व्हावे यासाठी सौंदत्ती देवस्थानाला रेल्वेशी संपर्क उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी लवकरच रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री एच के पाटील यांनी दिली.
यल्लामा क्षेत्र पर्यटन विकासासाठी जमिनीची कोणतीही कमतरता नाही. एक हजार एकर जमीन उपलब्ध असून त्या ठिकाणी सार्वजनिक अथवा खाजगी भागीदारांच्या माध्यमातून कामे हाती घेतली जाणार आहेत. लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांनी या विकासात सहकार्य करावे असे आवाहन नाही मंत्री एच. के. पाटील यांनी केले. राज्यात धार्मिक क्षेत्राच्या माध्यमातून वार्षिक तीनशे कोटी रुपये महसूल प्राप्त होतो. परंतु योग्य प्रशासन आणि महसूल गळती थांबविल्यास हा महसूल 3000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. सरकारने याकडे लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजनाची घ्याव्यात अशी मागणी विधान परिषद सदस्य कोटा श्रीनिवास पुजारी यांनी केली होती.
सौंदत्ती श्री रेणुका मंदिरासह जोगणभावचा देखील विकास केला जावा अशी मागणी करण्यात आली आहे.जोगनभाव येथे स्नान करूनच भाविक देवीच्या दर्शनासाठी जातात. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. या पाण्यात स्नान केल्याने रोग होत नाहीत असाही समज आहे. त्यामुळे या परिसराचा देखील विकास अपेक्षित असून येथे रोजगार देखील उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta