बेळगाव : बेळगाव शहराजवळ असलेल्या न्यू वंटमुरी येथील पीडित महिलेला 2.03 एकर जमीन देण्याचे आदेश सरकारने दिले असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
काकती पोलीस स्थानक हद्दीत येणाऱ्या न्यू वंटमुरी येथील पीडित महिलेला कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जाती विकास मंडळाने जमीन मालकी योजनेअंतर्गत जमीन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनुसूचित जाती कल्याण युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाचे मंत्री बी.नागेंद्र यांनी ही विशेष बाब मानून तातडीने जागा मंजूर करण्याचे आदेश दिले.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास मंडळाने पीडित महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी सदर जमीन विकसित करण्यास मान्यता दिली आहे. पीडित महिलेला 2.03 एकर जमीन मंजूर करण्याबरोबरच सरकारने पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई यापुर्वीच दिली आहे.