बेळगाव : बेळगावातील शेतकऱ्यांनी शेतात मद्यपींनी फेकलेल्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, पिशव्या आणि कचरा जमा करून राष्ट्रीय कृषी दिन आज एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
बेळगावातील येळ्ळूर-वडगाव रस्त्यावरील शेतकर्यांच्या शेतात रात्रीच्या वेळी अनेक मद्यपी दारूची पार्टी करून बाटल्या व इतर वस्तू फेकत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना त्यांच्या मशागतीच्या कामात अनेक अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित अधिकारी व पोलिसांना कळवूनही कोणताही फायदा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वतःच शेतात पडलेल्या दारू व बिअरच्या बाटल्या आणि कचरा गोळा करून 23 डिसेंबर हा राष्ट्रीय कृषी दिन आज अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला.
यासंदर्भात बोलताना शेतकरी नेते प्रकाश नाईक म्हणाले की, मद्यपींच्या उपद्रवामुळे शेतीच्या कामात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. आज माजी पंतप्रधान चरणसिंग चौधरी यांच्या जयंतीनिमित्त आम्ही शेताची स्वच्छता केली. याबाबत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना व पोलिसांना मद्यपींचा बंदोबस्त करण्यासाठी कळवूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्ही स्वतःच हे स्वच्छता अभियान चालवले असे त्यांनी सांगितले. कोणतेही सरकार आले तरी ते शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याचे शेतकरी नेते राजू मरवे म्हणाले. शेतकरी हा देशाचा कणा आहे, असे म्हणणारी सत्ताधारी सरकारेच आम्हाला पायदळी तुडवण्याचे काम करत आहेत, शेतकऱ्यांचे जीवन चिंताजनक आहे, पंतप्रधान किसान योजनेतून येणारा पैसा शेतकऱ्यांच्या जीवनासाठी पुरेसा नाही, काँग्रेस सरकारने वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
या स्वच्छता अभियानात कर्नाटक राज्य रयत संघटनेचे नेते प्रकाश नायक, राजू मरवे, चंद्रकांत कोंडूसकर, शेतकरी कामगार पक्षाचे विलास घाडी, गोपाळ सोमनाचे, भैरू कंग्राळकर, मोनाप्पा बाळेकुंद्री, तानाजी हलगेकर, मारुती बिर्जे, सुरेश मऱ्यान्नाचे, नितीन पैलवानाचे, महेश चतुर, सविता बिर्जे, राजश्री अवचारे, गोटू कानशिडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी भाग घेतला.